मुंबई : ठाण्याच्या मनोरुग्णालयाच्या आवारातील 742 झाडे तोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) स्थानिक शाखेने विरोध केल्याने या प्रकरणास आता राजकीय वळण मिळाले आहे. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मनोरुग्णालयाच्या पुनर्विकास योजनेसाठी रुग्णालयाच्या आवारातील 1614 झाडांपैकी 742 झाडे तोडावी लागणार आहेत. या योजनेत अत्याधुनीक मानसिक आरोग्य सुविधा दिली जाणार आहे. यात आधुनिक इमारती, सेवा तसेच पायाभूत सुविधा यांचा समावेश असणार आहे.
आम्ही पुनर्विकासाच्या विरोधात नाही. मात्र यासाठी 750 पेक्षा जास्त झाडांची कत्तल होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, असे ठाण्यातील वृक्षप्रेमींचे म्हणणे आहे. राज्य सरकारने अशी योजना तयार करावी की बाधित झाडांचे रुग्णालयाच्या आवारातच पुनर्रोपन केले जाईल, अशी मागणी पर्यावरणीय स्वयंसेवी संस्था व स्थानिक राजकारणी यांच्याकडून करण्यात येत आहे. प्रत्यारोपनानंतर झाडांचे अस्तित्व सुनिश्चित करेल, अशी आधारभूत योजनाही असावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
2023 साली घोषणा झालेल्या पुनर्विकास प्रकल्पात 57 एकरातील विस्तीर्ण वसाहतकालीन कॅम्पसमधील 25जुन्या इमारती पाडण्याचा समावेश आहे. याठिकाणी अत्याधुनीक सुविधा असलेल्या 20 नव्या इमारती उभारल्या जातील. या इमारतींमध्ये विशेष वॉर्ड, प्रशासकीय विभाग, रुग्णांसाठी केंद्रे व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने यांचा समावेश असेल. काही झाडे ही प्रस्तावित प्रकल्पाच्या अगदी मधोमध येत आहेत, असे मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याने ठाणे महापालिकेला पत्र लिहून मालमत्तेतील 742 झाडे तोडण्यासाठी परवानगी मागितली आहे. ठाणे मनोरुग्णालयाचे अधिक्षक नेताजी मुळीक यांच्या मते, वृक्षाच्छादन कमी करणे हे मानसिक आरोग्यासाठी प्रतिकूल आहे.
ठाण्यातील पर्यावरणवादी प्रशांत सिनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली असून या विषयावर स्वतंत्रपणे अभ्यास केला जावा, अशी मागणी केली आहे. ज्या झाडांचे वैज्ञानिकदृष्ट्या पुनर्रोपण करता येते त्यांना तोडण्याऐवजी त्यांचे पुनर्रोपण करण्यात यावे. वृक्षांवर कमीत कमी परिणाम होईल अशाप्रकारे पुनर्विकास योजना तयार करायला हवी, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ठाण्याचे प्रमुख मनोज प्रधान यांनी नुकतीच ठाणे मनोरुग्णालयास भेट दिली असता वृक्षतोडीबाबत अद्याप कोणतीही परवानगी नसताना काही वृक्ष तोडले गेल्याचा दावा केला. अगदी झाडाच्या फांद्या जरी तोडायच्या असतील तरी त्यास ठाणे महापालिकेच्या परवानगीची गरज आहे, असेही ते म्हणाले.
पुनर्विकासासाठी झाडांच्या कत्तलीस आम्ही तयार नाही
पुनर्विकास योजनेला आमचा पाठिंबा आहे.पण त्यासाठी झाडांची किंमत मोजण्यास आम्ही तयार नाही, असे ठाणे सीटीजन फौंडेशनचे अध्यक्ष कसबेर ऑगस्टीन यांनी सांगितले. येथील अनेक झाडांची पूर्ण वाढ झाली असून यामध्ये आंबा, फणस, कडुनिंब, नारळ, साग, उंबर, चाफा, अशोक व स्थानिक इतर प्रजातींच्या झाडांचा समावेश आहे. पूनर्लागवड केल्यानंतर त्यांच्या जगण्याचा दर फारच कमी होणार आहे, असेही ते म्हणाले.