मुंबई : ठाणे ते भिवंडी हे अंतर कमी वेळेत पार करणे आता शक्य होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत वसई खाडीवर सहा पदरी पूल उभारला जाणार असून यामुळे ठाण्यातील कोलशेत आणि भिवंडीतील काल्हेर ही ठिकाणे जोडली जातील.
सध्या ठाणे ते भिवंडी हा प्रवास करण्यासाठी 45 मिनिटांचा कालावधी लागतो. 2.2 किमीचा पूल उभारण्यासाठी 430 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या पुलामुळे 45 मिनिटांचा प्रवास 5 ते 7 मिनिटांत पूर्ण करता येईल. या पुलासाठी गुरुवारी निविदा काढण्यात आल्या. पुलाचे बांधकाम 3 वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
भिवंडी येथे मोठ्या प्रमाणावर गोदामे असल्याने व्यावसायिकदृष्ट्या या भागाला महत्त्व आहे. तसेच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानकही या ठिकाणी होणार आहे. भिवंडीतील गोदामांतून मालाची वाहतूक करणारी अवजड वाहने ठाणे-भिवंडी दरम्यान प्रवास करतात. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. सध्या कोलशेत ते काल्हेर हा प्रवास करण्यासाठी बाळकुम नाका, कशेळी पूल या मार्गाने प्रवास करावा. यात वाहनचालकांचा बराच वेळ वाया जातो. यामुळे मालवाहतुकीवर व पर्यायाने उद्योगधंद्यांवर परिणाम होतो.
भिवंडी अनुसूचित क्षेत्र
ठाणे ते भिवंडी पुलामुळे प्रामुख्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवला जाईल. यासोबतच भिवंडी अनुसूचित क्षेत्रही प्रस्तावित करण्यात आले आहे. या अंतर्गत वस्त्रोद्योग केंद्र आणि बहुउद्देशीय मार्ग उभारला जाणार आहे.