मुंबई : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ मार्गिकेच्या कशेळी येथील डेपोमध्ये पहिली मेट्रोगाडी दाखल झाली आहे. नव्या वर्षात या मार्गिकेचा पहिला टप्पा सुरू करण्यात येणार असून त्यादृष्टीने मेट्रोडेपोही सज्ज होत आहे.
ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो मार्गिकेसाठी कशेळी डेपोची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. या डेपोमध्ये मेट्रो गाड्या उभ्या करणे, त्यांची तपासणी, चाचणी आणि देखभाल केली जाणार आहे. डेपोचे काम सुरू असतानाच गाड्यांच्या आगमनासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख सुविधाही उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये कोच लोडिंग-अनलोडिंग प्लॅटफॉर्म आणि तात्पुरत्या तपासणी सुविधेचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मेट्रो गाड्यांचे स्वागत आणि प्राथमिक तपासणीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक व्यवस्था सज्ज झाली आहे.
एकूण २७ हेक्टर क्षेत्रावर विस्तारलेल्या या डेपोमध्ये सुमारे ३० मेट्रो ट्रेन संच सामावण्याची क्षमता आहे. यामध्ये पाच तपासणी मार्गिका, चार कार्यशाळा मार्गिका, स्वतंत्र चाचणी मार्ग आणि मेट्रो गाड्यांच्या स्वच्छतेसाठी विशेष सुविधांचा समावेश आहे. या सर्व सुविधांच्या माध्यमातून मेट्रो मार्गिका ५ वरील गाड्यांची दैनंदिन प्रवासी सेवेसाठी आवश्यक सज्जता आणि कार्यक्षमता कायम राखण्यास मदत होणार आहे.
मेट्रो ५ मार्गिकेवर ठाणे ते धामणकर नाका हा ११.९ किमीचा टप्पा असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या मार्गावर मेट्रोगाडीच्या चाचण्या घेतल्या जात असून डिसेंबर अखेरीस सुरक्षा चाचणी करून नव्या वर्षात मेट्रोसेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.