Sanjay Raut (File Photo)
मुंबई

BMC Election 2025 : मुंबईसाठी ठाकरे सेनेचे काँग्रेसला साकडे

काँग्रेसने मुंबईवरील संकटाचा गांभीर्याने विचार करावा : खा. संजय राऊत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणीतरी वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही मित्रपक्षांना अडचणीत येणारी कोणतीही भूमिका घेणार नाही. आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असून आम्हाला मुंबई अडाणीच्या घशात घालण्यापासून वाचवायची आहे. मुंबई मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे. त्यामुळे काँग्रेस पक्षातल्या मराठी नेतृत्वाने मुंबईवरील संकटाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांना सुनावले.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात गेल्या चार महिन्यांत नऊ वेळा भेटी झाल्या आहेत. महापालिका निवडणुकांसाठी दोन्ही ठाकरे एकत्र येतील अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी केलेल्या आवाहनाला महत्व प्राप्त झाले आहे.

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही, असे वक्तव्य काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केले होते. जगताप यांच्या विधानावर पत्रकारांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. एका दिवसाच्या प्रसिद्धीसाठी ही वाक्ये असतात, असा टोला लगावत राऊत म्हणाले, मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती. मुंबईचा लढा हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता आणि त्यात सर्व पक्ष मतभेद विसरून एकत्र आले होते.

आता पुन्हा एकदा त्याचप्रकारचे संयुक्त महाराष्ट्र लढ्यासारखे वातावरण मुंबईत आहे, असे सांगतानाच बिहारमध्ये काँग्रेस आणि तेजस्वी यादव अनेक ठिकाणी वेगवेगळ्या निवडणुका लढवत आहेत. निवडणुका जवळ आल्या तरी त्यांच्यात वाद सुरू आहे. मग तेथे उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे आहेत काय, असा सवाल करत आम्हाला हेही नको, आम्हाला तेही नको, असे करून चालत नाही. लोकशाही, संविधान आणि मुंबई वाचविण्यासाठीची ही लढाई आहे, ही अत्यंत निकराची लढाई आहे, हे आमच्या सहकाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे, असेही राऊत म्हणाले.

आम्हाला काँग्रेसचा पंतप्रधानच करायचा होता!

मुंबईत काँग्रेसचाच महापौर होईल, या भाई जगताप यांच्या भूमिकेवर राऊत म्हणाले, आम्हाला तर काँग्रेसचा पंतप्रधानच करायचा होता. पण होऊ शकला नाही. आम्ही इंडिया ब्लॉक निर्माण केला, तेव्हा आम्हाला राहुल गांधींना पंतप्रधान करायचे होते. त्यावेळी आम्ही असे म्हणालो नाही की, शिवसेनेचा करायचा आहे की अन्य पक्षांचा करायचा आहे. आमचा विचार आणि आमची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौराबद्दल काय घेऊन बसलात, तुम्ही 27 महानगरपालिकांचे महापौर काँग्रेसचे करा. आम्हाला काही अडचण नाही. भारतीय जनता पक्षाला रोखणं ही आमची भूमिका आहे. महापौर हा मराठी मातीतला होणे याला प्राधान्य देत आहोत, असे स्पष्ट करत अनेकदा आम्ही काँग्रेसचे सहकार्य घेतले हे आम्हाला विसरता येणार नाही, असेही राऊत म्हणाले.

मुंबई महापालिका काँग्रेसने स्वबळावर लढवावी : भाई जगताप

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज ठाकरे यांच्या मनसेसोबत लढविणार नाहीच. पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतही काँग्रेस आघाडी करणार नाही, काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवाव्यात , अशी मागणी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. पक्षासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत केलेली असते. त्यामुळे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही संधी असते. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी मिळणे गरजेचे आहे . त्यांचा तो हक्क आहे. त्यामुळे माझ्यासह काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी ही प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी केली आहे. तसेच हे माझे वैयक्तिक मत आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे भाई जगताप यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांच्या सोबत जाण्याचा प्रश्नच नाही. आणि तसे होणार नाही. काँग्रेसचा एकही मनसेसोबत जावे असे बोललेला नाही. पण उद्धव ठाकरे यांच्या सोबतही आघाडी करणार नाही, असे जगताप यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT