मुंबई : महाविकास आघाडीत 260 जागांचे वाटप निश्चित झाल्याचे दावे गुरुवारी करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीत आता सारे काही आलबेल असल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच या आघाडीतील बिघाडी शुक्रवारी अचानक समोर आली. विदर्भातील किमान सहा जागांसह किमान 28 जागांवरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे काँग्रेसशी फाटले असून यापुढे जागावाटपाच्या चर्चेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित असतील तर आम्ही हजर राहणार नाही, अशी टोकाची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. परिणामी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चाच ठप्प झाली आहे.
आघाडीतील तिढ्याच्या जागांची संख्या 20 ते 28 असली तरी विदर्भातील जागांवर सर्वाधिक तिढा आहे आणि या जागांसाठी ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच आहे. लोकसभेला अमरावती आणि रामटेक हे दोन लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाने काँग्रेसला सोडले होते. आता विधानसभेला विदर्भात चार ते पाच अधिक जागा काँग्रेसने ठाकरे गटाला सोडाव्यात, अशी ठाकरे गटाची मागणी आहे. विदर्भातील अशा काही जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात चर्चाही झाली. पण दोन्ही पक्ष हट्टाला पेटले आणि तिढा वाढला.
काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट या महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांचे 260 जागांचे वाटप झाले आहे. अवघ्या 28 जागांवर वाद आहे, असे गुरुवारी अधिकृतरीत्या सांगितले गेलेे. शुक्रवारी सकाळी खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे श्रेष्ठी के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी जागावाटपाबाबत चर्चा केली. याच दरम्यान संजय राऊत आणि पटोले यांच्यात धुमसत असलेला वाद अखेर टोकाला गेला आणि पटोले यांनी बैठक अर्ध्यावर सोडली. त्यानंतर राऊत व पटोले यांची स्वतंत्रपणे समजूत घालण्यात आल्यानंतर पटोले दीड तासानंतर बैठकीत परतले. शुक्रवारी या वादाला टोकाचे वळण मिळाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जागावाटपात अडवणूक करत आहेत. त्यामुळे आम्ही राज्यातल्या काँग्रेस नेत्यांसोबत जागावाटप करणार नाही, अशी आक्रमक भूमिका ठाकरे गटाने घेतली. नाना पटोले यांच्या भूमिकेविरोधात थेट काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे ठाकरे गटाने तक्रार केल्याचे समजते. विदर्भातील तिढा असलेल्या जागांवर नाना पटोले अडून बसल्याची तक्रार ठाकरेंच्या नेत्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रदेश काँग्रेसनेही तिढा असलेल्या जागांची यादी पक्ष श्रेष्ठींकडे पाठवली आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा वेगाने व्हावी आणि तातडीने निर्णय होण्याची गरज आहे. मला कारणांमध्ये पडायचे नाही. पण नक्कीच 200 पेक्षा जास्त जागांवर आमची सहमती आहे. उरलेल्या जागांचा पेच आहे. त्यासंदर्भात माझी शुक्रवारी उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. कुणाच्या काय भूमिका आहेत हे त्यांना सांगितले. शुक्रवारी सकाळी मी वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली. काँग्रेसचे रमेश चेन्नीथेला यांच्याशी चर्चा केली. राहुल गांधींशीही मी चर्चा करणार आहे. काही जागांवर गाडी अडली आहे. त्यातून मार्ग निघाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांना सांगितले. प्रचारासाठी कमी वेळ असल्याने तिढा असलेल्या जागांचा विषय तातडीने संपवावा, अशी भूमिका काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे मांडल्याचे ते म्हणाले.
शुक्रवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषदही ठाकरे गट व काँग्रेसच्या वादात भरडली गेली. जागावाटपाच्या वादामुळे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत या पत्रकार परिषदेला गैरहजर राहिले. खासदार अनिल देसाई आणि जितेंद्र आव्हाड यांना या पत्रकार परिषदेस पाठविण्यात आले.
महाविकास आघाडीत किमान 28 जागांवरून ठाकरे गट, काँग्रेस व शरद पवार गट असा तिढा निर्माण झालेला दिसतो.
मुंबईतील वांद्रे पूर्व, वर्सोवा आणि भायखळा या तीन जागांवर वाद आहे. विदर्भातील दर्यापूर, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, चंद्रपूर शहर, रामटेक तुमसर या जागा काँग्रेसला हव्या आहेत. मराठवाड्यातील गेवराई, उदगीर, परळी या जागांवरूनही रस्सीखेच आहे.
काही जागांसाठी ठाकरे गट आणि शरद पवार गटही आग्रही आहे. गेवराई, परळी या जागा शरद पवार गट मागत आहे. उदगीरची जागा ठाकरे गटाला हवी आहे.