मुंबई

Thackeray Brothers Protest: सीजेपीच्‍या समर्थनार्थ ठाकरे बंधूंचा ठिय्या; आजपासून तीव्र आंदोलनाचा इशारा

शिवाजी पार्क परिसरातील पोलीस कारवाईला मनसे आणि ठाकरे गटाचा विरोध; ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची सुटका, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: काॅक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची धरपकड आणि छत्रपती शिवाजी पार्क परिसरातील पोलीस बंदोबस्ताच्या विरोधात रविवारी, ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतला. मनसे नेते अमित ठाकरेंसह शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य आणि तेजस या तिघांनी शिवाजी पार्क परिसरातील पोलीस कारवाईला तीव्र विरोध दर्शविला.

अखेर, ताब्यात घेतेलेल्या सर्व आंदोलकांना पोलिसांनी सोडल्यावर ठाकरे बंधूंनी रविवारचे आंदोलन स्थगित केले. मात्र, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सोमवारपासून तीव्र आंदोलन छेडण्याची घोषणा यावेळी केली.

सीजेपीने ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रविवारी, शिवाजी पार्क परिसरात आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारत कडेकोट बंदोबस्त तैनात केला. त्यामुळे शिवाजी पार्क परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. पोलिसांनी सीजेपी कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले.

या सर्व कारवाईला विरोध करत अमित ठाकरे शिवाजी पार्कात दाखल झाले. 'तुम्ही शिवाजी पार्कला युद्धभूमी बनवले आहे.

वर्षानुवर्षे इथे राहणाऱ्यांनाही ताब्यात घेतले आहे. आजचा पोलिसांचा शेवटचा दिवस. उद्या दहा हजार लोकांना घेऊन रस्त्यावर उतरेन, आम्हाला अडवून दाखवा, असे म्हणत अमित ठाकरे यांनी सीजेपी कार्यकर्त्यांच्या धरपकडीला पोलिसांना विरोध केला.

या सरकारने विचित्र परिस्थिती आणली आहे, आपल्या डोळ्यांदेखत लोकशाही संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, आम्ही तसे होऊ देणार नाही, असे सांगत आदित्‍य ठाकरेंनी पकडलेल्या कार्यकर्त्यांच्या सुटकेची मागणी केली.

पोलिसांच्या व्हॅनमध्ये असलेल्या आंदोलकांना जोपर्यंत पोलीस सोडत नाही, तोपर्यंत तेथून हटणार नसल्याचे सांगत पोलिसांच्या व्हॅनसमोरच ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. पोलिसांनी बळाचा वापर करून ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बाजूला करून व्हॅन पुढे नेली.

अमित ठाकरेंच्या या भूमिकेनंतर शिवसेना भवनासह दादर परिसरात आंदोलक जमण्यास सुरुवात झाली. आदित्य आणि तेजस ठाकरेसुद्धा शिवसेना भवन परिसरात दाखल झाले. देशात आंदोलन करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार असून सोमवारी शिवाजी पार्क परिसरात पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असे आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले. त्यावेळी मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

अखेर तिन्ही ठाकरे बंधू पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलकांना सोडल्याशिवाय पोलीस ठाण्यासमोरील ठिय्या आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, असेही त्यांनी पोलिसांना सांगितले. अखेर, पोलिसांनी ठाकरेंना आंदोलकांना सोडणार असल्याचे आश्वासन दिले. तिन्ही ठाकरे बाहेर पडले.

पोलिसांनी अशाप्रकारची दडपशाही करू नये, अन्यथा महाराष्ट्र बंद करू, असा इशारा यावेळी आदित्य ठाकरेंनी दिला. शनिवारी पोलिसांनी तुषार गांधी यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले. लोकशाहीत आंदोलन करण्याचा नागरिकाला अधिकार असून त्याची पायमल्ली होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

पोलिसांच्या आजच्या वागण्याचा निषेध करण्यासाठी तसेच, ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा व्हावा यासाठी सोमवारी शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करण्यात येईल, असेही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

तसेच, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात आंदोलनात उतरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. आता सोमवारपासून तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगतानाच आंदोलनाचे ठिकाण आणि वेळ समाजमाध्यमातून कळविण्यात येईल, असेही आदित्य यांनी सांगितले.

जीपवर चढून आदित्य-अमित ठाकरे यांचे आवाहन

आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी जीपवर चढून जमलेल्या लोकांना आवाहन केले. शांततेने आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेण्याच्या कारवाईवर त्यांनी आक्षेप घेतला. आदित्‍य ठाकरे यांनी पोलिसांच्या कारवाईवर टीका केली आणि ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना कायदेशीर मदत देण्याची तयारी दर्शवली.

तेजस ठाकरेही सहभागी

आदित्य ठाकरे यांच्यासोबत तेजस ठाकरेही रस्त्यावर उतरले. राजकीय आंदोलनात उतरण्‍याची तेजस ठाकरे यांची ही पहिलीच वेळ होती.

परवानगी नसल्याने पोलिसांची कारवाई

आंदोलनासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली नसल्याने जमणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी परिसरात बॅरिकेड्स लावून बंदोबस्त वाढवला होता. सीजेपीने मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रविवारी सायंकाळी चार वाजता शिवाजी पार्क परिसरात जमण्याचे आवाहन केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT