राज व उद्धव ठाकरे बंधूंचे मनोमिलन दोन्ही पक्षांच्या फायद्याचे असले तरी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी तोट्याचे आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना (उबाठा) युती झाल्यास ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह माजी नगरसेवकांना गेल्या अनेक वर्षांपासून बांधलेला प्रभाग गमावण्याची भीती वाटत आहे.
हिंदी भाषेचा घेतलेला निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर राज ठाकरे व उद्धव ठाकरे तब्बल 19 वर्षांनंतर विजय मिळवण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी ठाकरे बंधूंनी एकत्र राहण्याचे स्पष्ट संकेत दिले. यामुळे मनसैनिक व शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी, ठाकरे गटाच्या पदाधिकारी व माजी नगरसेवकांना प्रभाग गमावण्याची भीती वाटू लागली आहे.
महापालिका निवडणुकीत प्रभागाचे वाटप करताना दोन्ही पक्ष मराठी लोकवस्तीमधील प्रभागावर दावा करतील. त्यामुळे मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढवायची असल्यास ठाकरे गटाला आपल्या बालेकिल्ल्यातील काही प्रभाग सोडावे लागतील. अशा प्रभागांमध्ये गेल्या काही निवडणुकीत विजय मिळवणार्या माजी नगरसेवकांसह नगरसेवक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपल्या उमेदवारीचा त्याग करावा लागेल.
मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून जाण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या प्रभागात सक्रिय आहेत. त्यात आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळेल यासाठी माझी नगरसेवकांनीही गेल्या काही दिवसांपासून फिल्डिंग लावली आहे. पण त्यांचा प्रभाग मनसेच्या वाट्याला गेल्यास नगरसेवक बनण्याचे आपले स्वप्न अधुरेच राहील, अशी भीती अनेकांना वाटत आहे.
ठाकरे गट व मनसे युती झाल्यास मनसे 227 पैकी किमान 70 ते 80 प्रभागांची मागणी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात दादर, लालबाग, वरळी, परळ, शिवडी, वडाळा, विक्रोळी जोगेश्वरी, अंधेरी पूर्व, मालाड पूर्व, गोरेगाव या मराठी लोकवस्तीतील व सुरुवातीपासून ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या काही प्रभागांवर मनसे दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या मिलनाचा जेवढा आनंद झाला. तेवढे टेन्शनही वाढले आहे.