TET exam paper leak
मुंबई: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे उद्या (दि. २८) संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात आलेली 'शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. परीक्षेला अवघे काही तास शिल्लक असतानाच या परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षा घोटाळ्यामुळे राज्यातील सुमारे साडेचार लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी झाले असून विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
NEET २०२६ परीक्षेतील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने यंदा सुरक्षिततेची कडक अंमलबजावणी केली होती. संपूर्ण राज्यातील एकूण १,०२८ केंद्रांवर दोन सत्रांत ही परीक्षा होणार होती. मात्र, आज (दि. २७) पहाटेच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी काही संशयित व्यक्तींच्या ठिकाणांवर धाड टाकली. या या कारवाईत संशयितांकडे टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित अत्यंत संवेदनशील साहित्य मिळून आले.
घटनेचे गांभीर्य ओळखून भिवंडी पोलिसांनी तपासासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून घेतले. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पडताळणी केली असता, संशयित व्यक्तींकडे सापडलेले प्रश्न आणि उद्या होणाऱ्या मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न तंतोतंत जुळत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास चक्रावेगवान केली आहेत.
'पारदर्शकतेसाठीच परीक्षा पुढे ढकलली'
"कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणातच पार पडली पाहिजे, हा परीक्षा परिषदेचा ठाम आग्रह आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याने उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे," असे राज्य परीक्षा परिषदेने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. शिक्षक पात्रता (TET) परिक्षेबाबत अद्यावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, असेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.