मुंबई: भारत चौथी महासत्ता झाल्याच्या चर्चा रंगत असतानाच, भारतीय रेल्वेच्या 'सुपरफास्ट' सेवेचा मात्र पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. रत्नागिरी ते मुंबई प्रवासासाठी ओळखली जाणारी गाडी क्रमांक २२१२० तेजस एक्सप्रेस तब्बल ६ तास ४५ मिनिटे उशिराने धावल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.
रविवारी (दि. ४ जानेवारी) रत्नागिरीहून संध्याकाळी ६:५५ वाजता सुटणारी तेजस एक्सप्रेस ३ तास १५ मिनिटे उशिराने म्हणजेच रात्री १०:२० वाजता रत्नागिरी स्थानकावर आली. मात्र, हा उशीर पुढे वाढतच गेला आणि रात्री ११:०५ वाजता ठाण्याला पोहोचणारी ही गाडी दुसऱ्या दिवशी सोमवार, ५ जानेवारी रोजी पहाटे ५:५५ वाजता पोहोचली.
कोकण रेल्वेच्या या विलंबामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. रात्री ११:१५ च्या सुमारास प्रवाशांना जेवण देण्यात आले, जे गाडीच्या मूळ वेळेनुसार तयार केल्यामुळे पूर्णपणे थंड झाले होते. मधुमेह असलेल्या रुग्णांना औषधे आणि जेवणासाठी ताटकळत राहावे लागले. मध्यरात्री २:३० वाजता गाडी ठाण्यात आली असती, तर टॅक्सीवाल्यांना अव्वाच्या सव्वा पैसे देऊन घरी कसे जायचे? असा संतप्त सवाल ज्येष्ठ नागरिक शरद कदम यांनी उपस्थित केला. तसेच स्टेशनवर ताटकळत असताना साध्या शौचालयासाठीही पैसे मोजावे लागल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
युरोपमधील देशांमध्ये रेल्वे किंवा विमानाला उशीर झाल्यास प्रवाशांना तिकिटाचे पैसे विलंबाच्या प्रमाणात परत मिळतात. तोच नियम आता भारतीय रेल्वेनेही लागू करावा, अशी मागणी जोर धरत आहे. तुमच्या तांत्रिक चुकीमुळे आम्हाला जो मानसिक आणि शारीरिक त्रास झाला, त्याची भरपाई म्हणून आमच्या तिकिटाचे संपूर्ण पैसे परत करावेत. आम्हाला फक्त तुमची दिलगिरी नको आहे, अशी स्पष्ट मागणी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. कोकण रेल्वेच्या या ढिसाळ नियोजनामुळे "नेहमी कोकणच्याच प्रवाशांच्या वाट्याला हा अन्याय का?" असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.