मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या खासगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना 31 हजार रुपये बोनस जाहीर झाला. परंतु हा बोनस प्रशासकीय प्रक्रियेमध्ये अडकल्यामुळे शिक्षकांच्या हातात दिवाळीनंतरच बोनस पडणार आहे.
मुंबई महानगरपालिका कर्मचार्यांप्रमाणे पालिकेच्या खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना 31 हजार बोनसची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे दिवाळीपूर्वी हा बोनस बँकेत जमा होईल, अशी अपेक्षा शिक्षकांची होती. परंतु शिक्षणाधिकारी यांच्याकडून परिपत्रक काढून ते परिपत्रक मुंबई महापालिका लेखापाल विभागाला सादर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय विविध खासगी अनुदानित शाळेमधील शिक्षकांची बोनस पे शीट जोपर्यंत महापालिकेच्या लेखापाल विभागाकडे जमा होत नाही. तोपर्यंत बोनस देणे शक्य नसल्याचे लेखापाल विभागातील एका वरिष्ठ अधिकार्यांकडून सांगण्यात येत आहे.
पे शीट जमा करण्यास एक जरी शाळेला उशीर झाला तर अन्य शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना तोपर्यंत बोनस देता येऊ शकत नाही. सध्या शाळांना सुट्टी असल्यामुळे शाळांमध्ये मुख्याध्यापक व अन्य कर्मचारी उपस्थित नाही. त्यामुळे पे शीट बनवण्यासाठी 30 ऑक्टोबर उजाडणार आहे. त्यानंतरच शिक्षकांच्या बँकेमध्ये बोनस जमा होईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले.
बोनस जाहीर होताच दुसर्या दिवशी महापालिका कर्मचार्यांच्या बँकेत तो जमा झाला. पण ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचा पगार मुंबई महापालिकेकडून देण्यात येतो. त्या शिक्षकांना मात्र बोनस उशिरा मिळणार असल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत असून किचकट प्रक्रिया महापालिका कर्मचार्यांप्रमाणे सोपी का करण्यात येत नाही, असा सवाल आता शिक्षकांनी केला आहे.
दिवाळी सणानिमित्त कपडे, अन्य वस्तू खरेदी करता यावे यासाठी बोनसचा उपयोग होतो. पण दिवाळीपूर्वी बोनसच मिळणार नसेल तर तो देऊनही देऊन काय उपयोग, असे मतही शिक्षकांनी व्यक्त केले.
शिक्षकांची बोनस पे शीट पालिकेच्या लेखापाल विभागाकडे जमा न झाल्यामुळे बोनस दिवाळीपूर्वी देणे शक्य नसल्याचे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.