एक पेगही धोकादायक! File Photo
मुंबई

Oral cancer causes study : एक पेगही धोकादायक!

तोंडाच्या कर्करोगासाठी मद्यपानाची सुरक्षित मर्यादा नाही; टाटा मेमोरियलच्या अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या मद्यपेयांचे अगदी कमी प्रमाणात नियमित सेवन केले तरी तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो आणि मद्यपानासाठी कोणतीही सुरक्षित मर्यादा नाही, असा महत्त्वाचा निष्कर्ष टाटा मेमोरियल सेंटरच्या नव्या अभ्यासातून समोर आला आहे.

टाटा मेमोरियल सेंटरमधील सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमियोलॉजी (ॲक्ट्रेक) यांनी केलेला हा व्यापक अभ्यास प्रतिष्ठित बीएमजे ग्लोबल हेल्थ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. अभ्यासानुसार, दररोज फक्त एका मानक पेयाइतके मद्यपान केल्यासही बक्कल म्यूकोसा (गालाच्या आतील भागाचा) कर्करोगाचा धोका सुमारे 50 टक्क्यांनी वाढतो. विशेषतः देशी दारू, ठर्रा, महुआ यांसारख्या स्थानिक मद्यांमुळे धोका सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

2010 ते 2021 या कालावधीत बक्कल म्यूकोसा कर्करोग झालेल्या 1,803 रुग्णांची आणि 1,903 निरोगी व्यक्तींच्या तुलनेवर हा अभ्यास आधारित आहे. मद्यपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये तोंडाच्या कर्करोगाचा धोका मद्यपान न करणाऱ्यांच्या तुलनेत 68 टक्क्यांनी अधिक असल्याचे आढळून आले.

तंबाखू सेवनासोबत मद्यपान केल्यास हा धोका आणखी गंभीर ठरतो. तंबाखू आणि मद्य या दोन्ही सवयी असलेल्या व्यक्तींमध्ये तोंडाच्या कर्करोगाचा धोका चार पटीने वाढतो, असेही अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले की, मद्यपेयांना आंतरराष्ट्रीय स्तरावर गट-1 कर्करोगकारक म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. तोंडाच्या कर्करोगासह किमान सात इतर कर्करोगांशी मद्यपानाचा थेट संबंध आढळतो.

ॲक्ट्रेकचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी देशात मद्यनियंत्रण धोरणे अधिक कडक करण्याची गरज व्यक्त केली. स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या देशी दारूवर प्रभावी नियंत्रण नसल्यामुळे सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

  • सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमियोलॉजीचे संचालक डॉ. राजेश दीक्षित यांच्या मते, भारतातील बक्कल म्यूकोसा कर्करोगाची सुमारे 11.5 टक्के प्रकरणे मद्यपानामुळे उद्भवतात. काही राज्यांमध्ये हा आकडा 15 टक्क्यांहून अधिक आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष स्पष्टपणे सूचित करतात की मद्यपान कितीही कमी असले तरी ते कर्करोगाला कारणीभूत ठरू शकते, त्यामुळे तंबाखूसोबतच मद्यपानावर नियंत्रण मिळवणे अत्यंत आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT