मुंबई : रक्ताच्या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांसाठी आणि प्रौढांसाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट (बीएमटी) इतके महाग आहे की कमी उत्पन्न गटातील लोकांना ते शक्य नाही. पण टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे बीएमटी केंद्र गरीब कुटुंबातून येणाऱ्या रुग्णांसाठी आशेचा किरण बनले असून गेल्या १७ वर्षांत टाटा हॉस्पिटलच्या बीएमटी सेंटरमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
टाटा रुग्णालयात बोन मॅरो प्रत्यारोपण २००७ मध्ये सुरू झाले. २००७ ते १८ऑक्टोबर २०२४ पर्यंत, बोन मॅरो ट्रान्सप्लांटद्वारे १०७६ रुग्ण बरे झाले आहेत. या बीएमटी केंद्रात दोन्ही प्रकारचे प्रत्यारोपण म्हणजे ऑटोलॉगस आणि लोजेनिक बोन मॅरो प्रत्यारोपण केले जाते. या केंद्रात दर महिन्याला सरासरी १० रुग्णांचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट केले जात आहे. रक्तदोष किंवा रक्त कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेंटरमध्ये उपचार केले जातात. यातील काही रुग्णांची या आजारातून सुटका करून त्यांचे प्राण वाचविण्यात मदत झाली आहे. एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, अनुभवी डॉक्टर आणि परिचारिकांची टीम, आवश्यक पायाभूत सुविधा आणि देणगीदारांच्या पाठिंब्याने आम्ही बीएमटीची आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन करू शकतो. रुग्णालयाचे जनसंपर्क माहिती अधिकारी डॉ. विनीत सामंत यांनी सांगितले की, टाटा रुग्णालयाने २००७ मध्ये खारघर येथील अॅक्ट्रेक सेंटरमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेंटर सुरू केले होते. स्थापनेच्या पहिल्याच वर्षी येथे ३ रुग्णांचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यात आले होते.