ताडदेवमध्ये बंद फ्लॅटचे कुलूप तोडून साडेदहा लाख रुपये लंपास pudhari photo
मुंबई

Mumbai theft case : ताडदेवमध्ये बंद फ्लॅटचे कुलूप तोडून साडेदहा लाख रुपये लंपास

ताडदेव पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : ताडदेव येथील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे साडेदहा लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे.

सदर घटना 7 मे सायंकाळी साडेचार ते 8 मे रात्री आठच्या कालावधीत ताडदेवच्या तुळशीवाडी, आंबेडकरनगर, सम्राट अशोक सोसायटीमध्ये घडली. याच सोसायटीच्या रुम क्रमांक 1705 मध्ये 55 वर्षांची तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिचे पती महापालिकेतून निवृत्त झाले आहेत. 4 मे रोजी तिचे पती त्यांच्या रत्नागिरीतील गावी तर महिला तिच्या आग्रीपाडा येथील भावाच्या घरी दोन दिवस राहण्यासाठी गेली होती.

शुक्रवारी 8 मे रोजी ती घरी आली असता तिला तिच्या फ्लॅटचे कुलूप तुटलेले दिसले. तिने आतमध्ये जाऊन पाहणी केली असता आतील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. लोखंडी कपाटाची पाहणी केल्यानंतर तिला सर्व सोन्याचे दागिने आणि रोख रक्क्म चोरीस गेल्याचे दिसून आले. या कपाटामध्ये विविध सोन्याचे दागिने आणि वीस हजारांची रोख रक्कम असा दहा लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल होता.

हा प्रकार लक्षात येताच तिने ताडदेव पोलिसांना ही माहिती सांगितली होती. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी तक्रारदार महिलेच्या जबानीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT