मुंबई : एकेकाळी केवळ मनोरंजन आणि वाचनासाठी ओळखला जाणारा टॅब्लेट आता बहुउपयोगी बनला असून त्याने लॅपटॉपसमोर आव्हान उभे केले आहे. लॅपटॉपच्या किमती वाढत असल्यामुळे अनेक ग्राहकांनी आपला मोहरा टॅब्लेटकडे वळवला आहे. मोठ्या स्क्रीनचे, अधिक मेमरी असलेले आणि कीबोर्डसह येणारे टॅब्लेट आता लॅपटॉपला पर्याय ठरत आहेत.
२०२६ च्या पहिल्या तिमाहीत २० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या उपकरणांचा वाटा एकूण टॅब्लेट विक्रीत ८६ टक्के होता.
ही वाढ ९२ टक्के इतकी होती. स्ट्रीमिंग, गेमिंग आणि ऑनलाइन शिक्षणासाठी मोठ्या स्क्रीनच्या टॅब्लेटचा वापर वाढत आहे. तसेच ६ जीबी रॅम असलेल्या टॅब्लेटची विक्री वर्षभरात २८४ टक्क्यांनी वाढली, तर १२ जीबी रॅम असलेल्या टॅब्लेटची विक्री ८३५ टक्क्यांनी वाढली.
१३ इंच किंवा त्याहून मोठ्या स्क्रीनच्या टॅब्लेटची विक्री २०२६ च्या पहिल्या तिमाहीत वर्षभराच्या तुलनेत ३३८टक्क्यांनी वाढली. १२ इंचाच्या उपकरणांची विक्री ७६ टक्के , तर ११ इंचाच्या उपकरणांची विक्री २९ टक्क्यांनी वाढली.
मोठ्या स्क्रीनला वाढती मागणी
टॅब्लेटची स्क्रीन जितकी मोठी, तितकी त्याची मागणी अधिक असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. १० इंचांपेक्षा लहान स्क्रीनच्या टॅब्लेटची विक्री एकूण बाजारपेठेच्या ५२ टक्के इतकी आहे. टॅब्लेट आणि लॅपटॉप यांच्यातील फरक आता हळूहळू कमी होत आहे. शाओमीच्या प्रवक्त्याने सांगितले की, टॅब्लेटचा वापर आता केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहिलेला नाही; लोक त्यांचा वापर दैनंदिन कामांसाठी आणि विशेष सॉफ्टवेअरची गरज नसलेल्या हलक्या कामांसाठी संगणकाप्रमाणे करू लागले आहेत.
तंत्रज्ञान, कामकाज आणि उत्पादकता यामध्ये होत असलेल्या बदलांमुळे संगणकीय कामकाजाचा अनुभव अधिक सोपा होत आहे, असे एचपी इंडियाचे विनीत गेहानी यांनी सांगितले. एचपीने विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, तरुण व्यावसायिकांसाठी आणि काम-शिक्षण यांच्यात संतुलन साधणाऱ्या ग्राहकांसाठी टॅब्लेटसारखी उत्पादने सादर केली आहेत.
या उपकरणांमध्ये कीबोर्ड जोडण्याची सुविधा आणि उत्पादकतेसाठी आवश्यक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. ऑक्टोबर–डिसेंबर २०२५ या कालावधीत भारतात विकल्या गेलेल्या टॅब्लेटपैकी सुमारे ८१ टक्के टॅब्लेट उत्पादकता, शिक्षण, गेमिंग आणि मनोरंजनासाठी वापरले जात होते. घरून काम करणे आणि ऑनलाइन शिक्षण यांसारख्या कारणांमुळे टॅब्लेटची मागणी वाढत आहे.