नवी मुंबई : स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यपूर्ण नवी मुंबईचा जागर नागरिकांपर्यंत पोहोचवत ‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन 2025’ हा उपक्रम पामबीच मार्गावर उत्साहात पार पडला. 7 रोजी सकाळी पहाटे 4.30 वाजता सुरुवात झालेल्या या उपक्रमात तब्बल 7 हजारहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवत उपक्रम यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या हाफ मॅरेथॉनमधील सर्वांत मोठ्या 32 किमी अंतराच्या मुख्य गटात नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्वतः धावपटू म्हणून धावत स्वच्छतेचा संदेश दिला. नागरिकांसमवेत धावत त्यांनी 32 किमीचे अंतर यशस्वीरित्या पूर्ण केले.
लेट्स सेलिब्रेट फिटनेस, नवी मुंबई महापालिका आणि श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी शताब्दी वर्षानिमित्त 5, 10, 21 आणि 32 किमी अशा विविध अंतरांच्या गटांमध्ये ही हाफ मॅरेथॉन पार पडली. यावेळी विविध वयोगटातील स्त्री-पुरुषांनी उत्साहाने धाव घेतली. युवकांचा सहभाग विशेष लक्षणीय होता.
पहाटे 4.30 वाजताही मोठ्या संख्येने उपस्थित धावपटूंच्या उत्साहाचे कौतुक करताना आयुक्त डॉ. शिंदे म्हणाले की, नागरिकांच्या या उत्साही सहभागामुळे स्वच्छ नवी मुंबईचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचतो आहे.यावेळी दिव्यांग धावपटूंनीही विशेष सहभाग नोंदवून प्रेरणादायी उपस्थिती दर्शवली, याचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. नवी मुंबईला स्वच्छ व पर्यावरणपूरक शहराचे मॉडेल म्हणून ओळख मिळावी, यासाठी हाफ मॅरेथॉनसारखे उपक्रम नागरिकांचा विश्वास वाढवत असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. आयोजनात सहकार्य केलेल्या लेट्स सेलिब्रेट फिटनेस, नवी मुंबई गुरुद्वारा सुप्रीम कौन्सिल, गुरुद्वारा श्री दशमेश दरबार आणि सर्व सहयोगी संस्थांचे त्यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, उपायुक्त किसनराव पलांडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, घनकचरा विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. माजी खासदार संजीव नाईक यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून धावपटूंना शुभेच्छा दिल्या. लेट्स सेलिब्रेट फिटनेस संस्थेच्या प्रमुख रिचा समित, नवी मुंबई गुरुद्वारा सुप्रीम कौन्सिलचे पदाधिकारी आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.