पुढारी ऑनलाईन डेस्क : 'अजित पवारांना जेव्हा मुख्यमंत्री बनवायचे असेल, तेव्हा त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू, संधी मिळेल तेव्हा त्यांना मुख्यमंत्री करू' असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये वक्तव्य केले होते. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या 'X' अकाउंटवर खोचक पोस्ट "करत अहोरात्र काम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचं काय होईल.?" असा सवाल केला आहे. (Maharashtra Politics)
सुषमा अंधारे यांनी आपल्या 'X' अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "दादा ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री होतील, असं देवभाऊ म्हणाले. आनंदच आहे; मग काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न घेऊन अहोरात्र काम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचं काय होईल.? अस म्हणंत त्यांनी 'मनावर दगड' हा हॅशटॅग दिला आहे.
राज्याच्या मुख्य़मंत्रीपदी अजित पवार यांना संधी मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तूळासह सोशल मीडियावर होत आहे. यावरुन एका मुलाखती दरम्यान बोलत असताना भाजपा नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले की,"महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदल होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका लढविल्या जातील. सहा महिन्यांत कोणत्याही गोष्टी बदलत नाहीत. अजित पवारांना जेव्हा मुख्यमंत्री बनवायचे असेल, तेव्हा त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू, संधी मिळेल तेव्हा त्यांना मुख्यमंत्री करू, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील नेतृत्व बदलावरील चर्चेला पूर्णविराम दिला हाेता.
दरम्यान, शिंदे फडणवीस सरकारकडे पुरेसे संख्याबळ असताना अजित पवारांना सोबत घेण्याबाबतच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, एखादा राजकीय पक्ष तुमच्याबरोबर येऊ इच्छित असेल, तर त्यांना युतीत न घेणे, हा योग्य निर्णय असू शकत नाही.. राजकारणात नेहमीच आपली ताकद संघटीत करावी लागते, वाढवावी लागते, असेही फडणवीस म्हणाले हाेते.