मुंबई ः स्त्रीमुक्ती चळवळ गाव-पाड्यांपर्यंत पोहोचली आहे, यासाठी महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदेचे कौतुक आहे, पण उंबरठ्याबाहेर पडलेल्या स्त्रियांना आरक्षणाच्या माध्यमातून समान अधिकार देऊ शकलो आहे का, याचा मोकळा विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खा. सुप्रिया सुळे यांनी केले. महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या विद्यमाने परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्यव्यापी परिषदेचे आयोजनाप्रसंगी त्या बोलत होत्या.
परिषदेचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे, परिषदेच्या अध्यक्षा शारदा साठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चैनिता कामत, छाया दातार, निशा शिवूरकर, सुनिता बागल, प्रज्ञा दया पवार, लता भिसे-सोनावणे, मनीषा गुप्ते, अमोल केळकर आणि कायदे तज्ज्ञ इंदिरा जयसिंग, सईदा हमीद उपस्थित होत्या. खासदार सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या, आज आपण 21 व्या शतकात असलो तरी महिलांना समाजात मोकळा श्वास घेता येतो का, या प्रश्नाचे उत्तर आजही नाही असेच येते. याला स्त्री-पुरूष दोघेही कारणीभूत आहेत, आपण पेहरावात बदल केला, पण आपली मानसिकता बदलली आहे का ? त्या जळमटलेल्या विचारातून आपण बाहेर पडलो नाही, हे कबूल करायलाच हवे, असे प्रश्न उपस्थित केले.
मनरेगा न्यूक्लीअर पॉवरवर चर्चा व्हावी
केंद्र सरकारने मनरेगा योजनेचे नाव जी. राम जी केले आहे. या योजनेत पुढच्या 6 महिन्यांत हाताला काम मिळेल का, अशी परिस्थिती आहे. कारण पूर्वी या योजनेसाठी केंद्र सरकार पैसे देत असे, आता केंद्र सरकार या योजनेचे पैसे टप्प्याटप्प्याने कमी करणार आहे, राज्य सरकारांना या योजनेचे पैसे देणे परवडणार आहे का ? असा सवाल करत सरकार ही योजना बंद करणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
सुप्रिया सुळेंचे धर्मसंकट
महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी राजकीय फटकेबाजी केली. सुळे म्हणाल्या, माझ्या घरी स्त्री-पुरूष वेगळे असे काही वातावरण नव्हते. सासरही तसेच मिळाले. माझ्या दोन्ही आज्या निर्मलाबाई शिंदे आणि शारदाबाई पवार एक पवार आणि शिंदे असे सुप्रिया सुळे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. त्यावेळी सुळे यांनी मी माझ्या माहेरबद्दलच बोलते आहे. हे मंत्रालयातील 5,6,7 या मजल्याबद्दल बोलतच नाही, असा खुलासा करत मंत्रालयातील या मजल्यावर कोण कुठे बसते, याबद्दल खूपच गोंधळ आहे, असा टोला खा. सुप्रिया सुळे यांनी लगावला.