मुंबई : देशभरात 2014 सालचे वातावरण वेगळे होते. तेव्हाचे सरकार गेलेच पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत होते. मात्र, आताचे वातावरण तसे नाही. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भरघोस मतदान करणारा मतदार तीन महिन्यानंतरच्या विधानसभेत वेगळा विचार करतो, वेगळ्या पद्धतीने मतदान करतो. याचे खरे तर आपण सर्वांनी चिंतन करायला हवे, असे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी केले.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टने ‘विद्वेषाच्या काळात प्रेमाचा उद्गार’ या दोन दिवसीय परिसंवादात सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी विधानसभा निवडणुकांच्या निकालाचा संदर्भातील चर्चेवर भाष्य करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, यश आणि अपयश हे दोन्ही पचविता आले पाहिजे. निवडणुका हरलो, म्हणून सगळे आयुष्य उद्ध्वस्त झाले असे नसते, असे सुळे म्हणाल्या. अमुक सरकार आले म्हणून सगळेच वाईट होणार असे नसते. प्रत्येक सरकार आपापल्या काळात काही ना काही चांगली कामे करतच असते. सरकार ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे आता विरोधकांचे सरकार आले म्हणून टोकाचा विचार मांडण्याची गरज नाही. असा टोकाचा विचार समोरच्या बाजूने अनेकदा मांडला जातो. सध्या देशात आणि राज्यात याबाबतचा जो हा ट्रेंड तयार झाला आहे तो मोडून काढला पाहिजे. टीका करतो तेव्हा त्यांच्याकडून आलेले उत्तर स्वीकारण्याची हिंमतही आपण ठेवली पाहिजे, असेही सुळे म्हणाल्या. दरम्यान, संविधान बचाओ अभियानावरही सुप्रिया सुळे म्हणाल्या, संविधान बचाओ म्हणताना, संविधान वाचवायचे म्हणजे नेमके काय वाचवायचे, हे सुद्धा लोकांपर्यंत पोहोचायला हवे. संविधान ही वरवरची बाब नाही.