मुंबई: पावसाने ओढ दिल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. हिंमत खचू देऊ नका. एकाही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे.राज्य सरकारने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी
उपाययोजना लागू करण्याचा घेतलेला निर्णय शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलासा देणारा आहे. शासनाने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. प्रशासनाला प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मदतीपासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. शेतकऱ्यांच्या भावना आणि त्यांच्या अडचणींची शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर मदत मिळावी, यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
दुष्काळी परिस्थितीत शेतकरी कुटुंबांना पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पिण्याचे पाणी आणि चारा उपलब्ध करून देण्याबाबत शासन आवश्यक ती कार्यवाही करणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीही आवश्यक ती मदत करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे पवार यांनी सांगितले.