सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती Pudhari news Network
मुंबई

सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या मुख्य सचिव

प्रथमच महिला अधिकारी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी सौनिक यांनी मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून प्रभार स्वीकारला. सौनिक यांच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या प्रशासकीय कारभाराची सूत्रे प्रथमच महिला अधिकार्‍याच्या हाती आली आहेत. अंतरिम अर्थसंकल्पात महिलांसाठी विविध योजना, सवलतींची घोषणा करणार्‍या महायुती सरकारने मुख्य सचिवपदी महिला अधिकार्‍याची केलेली निवड सूचक मानली जात आहे.

राज्याचे मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांचा कार्यकाल रविवार, 30 जून रोजी संपला. करीर यांच्या निवृत्तीनंतर राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती होणार याकडे लक्ष लागले होते. सेवाज्येष्ठतेनुसार 1987 च्या तुकडीतील गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, 1988 च्या तुकडीतील महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार आणि 1989 च्या तुकडीतील मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इकबालसिंह चहल हे मुख्य सचिवपदाचे दावेदार मानले जात होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुजाता सौनिक यांच्या नावाला पसंती दिल्याचे समजते. विशेष म्हणजे सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक यांनीही राज्याचे मुख्य सचिव पद भूषविले आहे.

शिस्तप्रिय अधिकारी

1987 च्या तुकडीतील सनदी अधिकारी असणार्‍या सुजाता सौनिक यांनी गेली तीन दशके राज्यासह देशात आणि संयुक्त राष्ट्रसंघात विविध जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत. शिस्तप्रिय अशी प्रतिमा असणार्‍या सुजाता सौनिक यांनी सामान्य प्रशासन, वित्त, आरोग्य, शिक्षण आदी विभागात काम केले आहे. राज्याचे मुख्य सचिव म्हणून त्यांना जून 2025 पर्यंतचा कार्यकाळ लाभणार आहे.

दोनदा हुलकावणी

सुजाता सौनिक यांची सेवाज्येष्ठतेनुसार मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली. मात्र यापूर्वी सेवाज्येष्ठता असूनही दोनदा त्यांना या पदाने हुलकावणी दिली. एप्रिल 2023 मध्ये पहिल्यांदा त्यांचे पती मनोज सौनिक यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली. मनोज सौनिक यांच्या निवृत्तीनंतर या पदावर 1988 च्या तुकडीतील नितीन करीर यांचा नंबर लागला. करीर हे यावर्षी मार्चमध्ये निवृत्त होणार होते. मात्र लोकसभा निवडणुकांमुळे त्यांना तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली.

तीन महिला अधिकार्‍यांनाही होती संधी

यापूर्वी मेधा गाडगीळ, चित्कला झुत्शी आणि चंद्रा अय्यंगार या तीन महिला अधिकारी सेवाज्येष्ठतेनुसार मुख्य सचिव पदाच्या दावेदार होत्या. पण त्यांना संधी मिळू शकली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT