Sujata Madke ISRO scientist
मुंबई : स्वप्निल कुलकर्णी
असं म्हटलं जातं की, स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपेत बघता,स्वप्न ते आहे जे तुम्हाला झोपूच देत नाही...अगदी अशाच प्रकारे ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील सुजाता मडके यांनी शास्त्रज्ञ होण्याच्या आपल्या स्वप्नांना कठोर मेहनतीची जोड दिली. ठाणे आरटीओमध्ये सहायक निरीक्षक म्हणून निवड झाल्यानंतरही त्यांनी आपल्या ध्येयपूर्तीच्या दिशेने प्रवास सुरूच ठेवला. जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम या त्रिसूत्रीवर जोर देत इस्रोच्या अवकाशाला गवसणी घातली. सध्या त्या इस्रोमध्ये शास्त्रज्ञ/अभियंता या पदावर कार्यरत आहेत. त्यांचा इस्रोमधील काम करण्याचा अनुभव, परीक्षेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न, याविषयी त्यांच्यासोबत साधलेला संवाद.
शास्त्रज्ञ म्हणून करिअर करावे असे कधी ठरवले? इस्रोमध्ये काम करायची संधी मिळेल असे वाटले होते का?
शास्त्रज्ञ व्हायची इच्छा लहानपणापासूनच होती. थोर शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे अग्निपंख हे पुस्तक वाचले. त्यामुळे शास्त्रज्ञ व्हायची प्रेरणा मिळाली. आपण कठोर मेहनत घेतली, तर आपण आपल्ो ध्येय साध्य करू, असा आत्मविश्वास होता. त्या दृष्टीने कठोर परिश्रम घेतले आणि आज त्याचे फळ मिळाले, असे वाटते. इस्रोमध्ये काम करायची संधी मिळेल, असे कधीच वाटले नव्हते. इस्रोची परीक्षा ही स्पर्धात्मक असते आणि ती राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. पण मी आपले शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला.
इस्रेोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली हे समजल्यावर पहिली प्रतिक्रिया काय होती?
निवड झाल्याची बातमी कळताच आनंद झाला. खरं तर ही मोठी प्रोसेस असते. त्यामध्ये दीड वर्ष गेले. विशेषतः आई-वडिलांना माझ्यापेक्षा जास्त आनंद झाला. त्यांच्या डोळ्यांतले आनंदाश्रू पाहिले आणि माझ्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले. हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण आहे.
शैक्षणिक प्रवासाबद्दल सांगा?
मी प्राथमिक शिक्षण गावात घेतल्यानंतर माध्यमिक शिक्षण खाडे विद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर बिर्ला महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे येथून बी. टेक. (मेकॅनिकल इंजिनीअरिंग) पूर्ण केले. त्यानंतर महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन परिषदमध्ये असिस्टंट इंजिनीअर पदावर नियुक्ती मिळाली.
आरटीओमध्ये पूर्णवेळ काम करत असताना तुम्ही इस्रोच्या अभ्यासासाठी वेळ कसा काढला?
सरकारी नोकरी करत असताना इस्रोसारख्या संस्थेच्या परीक्षेची तयारी करणे नक्कीच सोपे नव्हते. मी दररोज सुमारे सहा तास माझ्या अभ्यासासाठी दिले. वेळेचे व्यवस्थापन ही एक कला आहे. तुम्हाला तुमचा प्राधान्यक्रम योग्यरित्या ठरवता यायला हवा. कधीकधी 24 तास खूप कमी वाटतात, पण जर तुम्हाला खरोखर काही हवे असेल तर तुम्हाला वेळ मिळेल. व्यस्त वेळापत्रकातही मी मित्र आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवला. या संतुलनामुळे मी मानसिकदृष्ट्या मजबूत राहिले.
आरटीओमधील निरीक्षक ते इस्रोमधील शास्त्रज्ञपर्यंतचा प्रवास कसा होता? कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला?
आरटीओ ऑफिसर ते इस्रोमधील शास्त्रज्ञ हा प्रवास नक्कीच चांगला आणि सकारात्मक होता. 27 जानेवारी 2023 रोजी मी ठाणे आरटीओमध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षक म्हणून रुजू झाले. माझा पहिला प्रेफरन्स इस्रोसाठीच होता. त्यादरम्यान आरटीओमध्ये काम करायची संधी मिळाली. त्यामुळे ती मी स्वीकारली. आरटीओमधील वरिष्ठांनी मला खूप सहकार्य केलं. अडचण एकच होती, मी राहायला शहापूरला होते. त्यामुळे शहापूर ते ठाणे रोज दोन तास जायला आणि दोन तास यायला असा चार तास प्रवास करावा लागे. त्यादरम्यान मी इस्रोच्या परीक्षेचा अभ्यास सुरूच ठेवला.
इस्रोमधील कामाच्या जबाबदाऱ्या कशा असतात? तेथील काम करायचा अनुभव कसा आहे?
इस्रोमधील कामाचा अनुभव चांगला आहे. सध्या मी क्वॉलिटी एशुरन्स विभागात काम करते. सध्या मी शास्त्रज्ञ/अभियंता या पदावर कार्यरत आहे. सध्या मी प्रोबेशनवर आहे. 24 नोव्हेंबरला माझे ॲक्च्युअल दोन महिन्यांचे प्रशिक्षण सुरू होत आहे. त्यानिमित्ताने मला श्रीहरिकोटा येथील लॉन्चिंग सेंटरमध्ये काम करता येणार आहे.
दोन्ही संस्थांमध्ये काम करण्याची पद्धत आणि शिस्त या बाबतीत तुम्हाला कोणता फरक जाणवला?
केंद्र आणि राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये फरक आहे, यामध्ये शंका नाही. पण माझ्या बाबतीत, दोन्ही संस्था वेगवेगळ्या आहेत, म्हणून त्यांची तुलना करणे योग्य नाही. आरटीओच्या तुलनेत इस्रोमध्ये शिस्त आणि एखाद्या कामाबद्दलची तयारी करण्याची पद्धत वेगळी आहे. दोन्ही ठिकाणची प्रतिष्ठा आणि कार्यशैली वेगळी आहे. आरटीओमध्ये, माझे काम पूर्णपणे सार्वजनिककेंद्रित होते, म्हणून आपण दोघांची तुलना करू शकत नाही.
आता तुम्ही इस्रोचा भाग आहात, तुमचे भविष्यातील ध्येय काय आहे?
माझे बंगळुरू येथे पोस्टिंग झाले आहे. सध्या जे प्रशिक्षण सुरू होणार आहे, त्यावर मी लक्ष केंद्रित केले आहे. माझे ध्येय इस्रोच्या आगामी मोहिमा आणि संशोधन प्रकल्पांमध्ये योगदान देणे आहे. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचा भाग असणे हे एक स्वप्न सत्यात उतरणे आहे आणि मी देशाच्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये अर्थपूर्ण योगदान देऊ इच्छिते.
आपले आवडते छंद कोणते? कोणती पुस्तके वाचायला आवडतात?
वाचन हा माझा आवडता छंद आहे. त्यानिमित्ताने अग्निपंख, लेखक रॉबिन शर्मा यांची पुस्तके, ययाति छावा अशी पुस्तके वाचली. सध्या रामचंद्र मानस ही पुस्तकांची सीरिज वाचत आहे.
यशाचे श्रेय तुम्ही सर्वांत जास्त कोणाला देता?
माझ्या यशाचे श्रेय मी माझ्या कुटुंबाला, माझ्या शिक्षकांना आणि आरटीओ विभागाला देते. त्यांच्या सततच्या पाठिंब्यामुळे, विश्वासामुळे आणि प्रोत्साहनामुळे हे शक्य झाले. मी एवढेच सांगेन, कठोर परिश्रम करा, सातत्य ठेवा आणि कधीही हार मानू नका. यश एका रात्रीत मिळत नाही!