बेस्ट बसेस pudhari photo
मुंबई

Suhas Samant | अखेर सुहास सामंतांना बेस्टमधून हटवले

बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदी सचिन अहिर, सरचिटणीसपदी नितीन नांदगावकर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : बेस्ट क्रेडिट सोसायटीमध्ये झालेल्या पराभवामुळे अखेर ज्येष्ठ कामगार नेते सुहास सामंत यांना बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. तर बेस्ट कामगार सेनेची जबाबदारी कामगार नेते आमदार सचिन अहिर यांच्यावर सोपवीत, त्यांना थेट अध्यक्ष करण्यात आले. बेस्ट कामगार सेनेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कामगार नेते सुहास सामंत कार्यरत आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे समर्थक समजल्या जाणार्‍या सामंत यांचे पूर्वी मातोश्रीमध्ये चांगलेच वजन होते. बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदी नारायण राणे असताना सामंत यांनी सरचिटणीस पद भूषवले होते. पण राणे आणि शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केल्यानंतर बेस्ट कामगारांची सर्व जबाबदारी सामंत यांच्यावर टाकण्यात आली. ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे झेलली. अलीकडे त्यांच्या कार्यपद्धतीवर बेस्ट कामगार नाराज होते. त्यामुळे त्यांच्या विरोधातील तक्रारींमध्ये वाढ झाली होती. त्यात बेस्ट क्रेडिट सोसायटीमध्ये शिवसेनेचा एकही संचालक निवडून न आल्यामुळे संपूर्ण खापर सामंत यांच्यावर फोडण्यात आले. सामंत यांना थेट मातोश्रीतून राजीनामा देण्याचे फर्मान निघाले. त्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण तू यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तब्बल महिनाभरापेक्षा जास्त काळ निर्णय घेतला नाही.

अखेर अचानक सामंत यांना हटवून आदित्य ठाकरे यांच्या खास मर्जीतील विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांना बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष बनवले. त्यामुळे बेस्टमधील सामंत समर्थकांना हा मोठा धक्का मानला जात आहे. सरचिटणीसपदी नितीन नांदगावकर व प्रमुख मार्गदर्शक म्हणून गौरीशंकर खोत यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे बेस्ट कामगार सेनेचे सदस्य असलेल्या कामगारांना नवीन पदाधिकारी मिळणार असले तरी, सामंत यांच्यासारख्या अनुभवी व ज्येष्ठ कामगार नेत्याला मुकावे लागणार आहे.

मुलाच्या दुःखातून सावरण्यासाठी सामंतांना सक्रिय ठेवणे आवश्यक होते

कामगार नेते सुहास सामंत यांच्या मुलाचे अलीकडेच अवघ्या 42 व्या वर्षी हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे म्हातारवयात त्यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून सावरण्यासाठी त्यांना कामगार सेनेत सक्रिय ठेवणे आवश्यक होते. परंतु मातोश्रीने त्यांना हटवून चुकीचे पाऊल उचलण्याची चर्चा आता बेस्टमध्ये रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT