मुंबई : वंध्यत्वाच्या समस्येमुळे बाळ न झालेल्या जोडप्याला लग्नाच्या १३ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर गर्भधारणा झाली. सातव्या आठवड्यात गर्भवती मातेने १.२ किलोच्या बाळाला जन्म दिला. मात्र या बाळाला जन्मजात क्षयरोगाचे निदान झाले. जन्मल्यानंतर पुढची पाच महिने या बाळाने मृत्यूशी झुंज दिली. जगण्यासाठी या बाळाने केलेला संघर्ष अखेर यशस्वी ठरला असून त्याच्यावर वाडिया रुग्णालयात उपचार करण्यात आले.
मुंबईतील घाटकोपर येथील राहणारे निशांत आणि निलिमा गुप्ते (नाव बदलले आहे) या जोडप्याने एप्रिलमध्ये मुलाला जन्म दिला. लग्नाच्या १३ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर आणि वंध्यत्वाशी झुंज दिल्यानंतर त्यांना झालेली ही अपत्याप्रातप्ती त्यांच्यासाठी आनंद द्विगुणित करणारी होती. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयव्हीएफद्वारे त्यांनी बाळाला जन्म दिला. मात्र जेव्हा त्यांच्या अकाली जन्मलेल्या व १.२ किलो वजनाच्या नवजात बाळाला गंभीर गुंतागुंतीते निदान झाले. तेव्हा मात्र त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. जन्मानंतर पहिल्याच दिवशी बाळाला श्वसनाचा त्रास जाणवू लागला आणि त्याला मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळाला व्हेंटिलेटरवरून काढणे अशक्य होते. ज्यामुळे पालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यांनी पुढील उपचारासाठी मुंबईतील वाडिया बाल रुग्णालयाकडे धाव घेतली.
बालरोग फुफ्फुस तज्ज्ञ डॉ. परमार्थ चांदने सांगतात की, जुलैमध्ये जेव्हा बाळा आमच्याकडे उपचाराकरिता दाखल झाले तेव्हा बाळाच्या आरोग्याची स्थिती अत्यंत गंभीर होती, त्याला नॉन-इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशनची आवश्यकता होती. आईमध्ये वंध्यत्वाचा वैद्यकिय इतिहास आणि दोन्ही फॅलोपियन ट्युब काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया तसेच बाळाचा प्रकृती ठिक नसल्याचे छातीचा एक्स-रे आणि सीटी स्कॅन यावरुन दिसून आले. यामध्ये जन्मजात टीबीचे असल्याची शक्यता वाटल्याने ब्रॉन्कोस्कोपी करण्यात आली, ब्रॉन्कोस्कोपीमध्ये जन्मजात टीबीचे निदान झाले, ही एक अत्यंत दुर्मिळ स्थिती असून त्यावर उपचार करणे अनेकदा आव्हानात्मक ठरते.