राज्यातील दहावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरचा एक आश्वासक पर्याय ठरणार्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी नोंदणी झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2025- 26 मध्ये पॉलिटेक्निकच्या अंतिम गुणवत्ता यादीत तब्बल 1 लाख 36 हजार 34 विद्यार्थ्यांची नोंद झाली असून, ही गेल्या पाच वर्षांतील सर्वात मोठी आकडेवारी ठरली आहे. ही वाढ तंत्रशिक्षण विभागाने घेतलेल्या योजनाबद्ध धोरणामुळे आणि अनेक नव्या बदलांमुळे दहावीनंतरच्या विद्यार्थ्यांचा तांत्रिक शिक्षणावर भर असल्याचे दिसून आले आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर म्हणाले, पॉलिटेक्निक हा केवळ एक डिप्लोमा कोर्स नसून, तो विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधिष्ठित शिक्षणाचा दरवाजा उघडला जात आहे. रोजगारक्षम, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि उद्योगजगतात मागणी असलेल्या विद्यार्थ्यांची घडण यातून होते. यावर्षी काही विद्यार्थ्यांना 1 लाखाचे वार्षिक पॅकेज मिळाले असून, ही बाब इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरते आहे.
तांत्रिक क्षेत्रातील भरपूर मागणी, हाताळता येणारी कौशल्ये आणि थेट पदवी अभियांत्रिकीमध्ये प्रवेशही मिळत असल्याने आता विद्यार्थी पदविका अभ्यासक्रमांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य देत आहे. विद्यार्थ्यांमध्ये पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाविषयी जागरूकता वाढली असून, करिअरच्या संधी अधिक स्पष्ट झाल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले. पॉलिटेक्निक पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सरकारी आणि खासगी क्षेत्रात भरपूर संधी मिळत असल्याने आता दहावीनंतर विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
तंत्रशिक्षण संचालनालयाने शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी ‘स्कूल कनेक्ट’ उपक्रम, शैक्षणिक संस्था व जिल्हा पातळीवरील प्रचार-प्रसार यांसारख्या अनेक उपक्रमांची अंमलबजावणी केली. राज्यातील शाळांमध्ये जाऊन, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांशी थेट संवाद साधण्याचे प्रयत्न आम्ही केले. सोशल मीडियावर अभ्यासक्रमाची माहिती पोहचवण्यात आली. याचे सकारात्मक परिणाम आम्हाला आकडेवारीत दिसून आले.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने ‘के स्किम’ अंतर्गत नवीन अभ्यासक्रम राबवले असून, यामध्ये थ्रीडीप्रिंटिंग,आर्टिफिशियल इंटेलिजन्स, टीओआय, रोबोटिक्स यांसारख्या नवतंत्रज्ञानांचा समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय सोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे राज्यातील आठ शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलंन्स’ उभारण्यात येणार आहेत.
राज्यातील 185 पॉलिटेक्निक संस्थांमध्ये मराठी-इंग्रजी द्विभाषिक माध्यमातून शिक्षण देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 95 हजार 511 प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी 41 टक्के विद्यार्थी म्हणजेच 39 हजार 689 द्विभाषिक माध्यमात शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक साहित्य, पुस्तके, प्रेझेंटेशन, हे मंडळाच्या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून दिले आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाने दिली.
कुशल मनुष्यबळ व कौशल्य प्रशिक्षणावर आता भर असल्याने पॉलिटेक्निकला प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी गतवषीर्र्प्रमाणे यंदाही नोंदणी विद्यार्थ्यांनी केली आहे. याचा परिणाम आता प्रवेशातही दिसून येईल. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेश वाढणार आहेत.डॉ. विनोद मोहितकर, संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय