मुंबई : तब्बल साडेसात लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देत असलेल्या ‘एमएचटी’ सीईटी दरम्यान गैरप्रकार घडू नये म्हणून परीक्षा केंद्राबसह प्रत्येक विद्यार्थ्यावर कडक नजर ठेवली जाणार आहे. डमी विद्यार्थी शोधण्यासाठी क्यूआर कोड स्कॅनिंगसह फेशियल रेकग्निशन केले जाणार आहे. पर्यवेक्षकांच्या अंगावर बॉडी कॅमेरे लावण्यात येणार असून, त्यावर कंट्रोल केबिनमधून देखरेख केली जाणार आहे.
अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी याबरोबरच लॉ, बीएड, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, एमबीए, एमसीए आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात, सीईटी गुणांच्या आधारे तब्बल 19 हून अधिक अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जातात. या अभ्यासक्रमांच्या राज्यभरात असलेल्या विविध संस्थांतील सुमारे पाच लाख जागांवरील प्रवेश हे या परीक्षांच्या गुणावरच दिले जातात. यंदा सर्वाधिक विद्यार्थी असलेल्या ‘एमएचटी’ परीक्षेदरम्यान कुठलेही गैरप्रकार घडू नये म्हणून विद्यार्थ्यांबरोबरच परीक्षा केंद्रावर करडी नजर ठेवली जाणार आहे. परीक्षा देण्यासाठी उपस्थित राहणार्या उमेदवारांच्या प्रवेश पत्राची पडताळणी क्यूआर कोडच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच उमेदवारांचे फेशल रेकग्निशन (चेहरा पडताळणी), बायोमॅट्रिक उपस्थिती घेण्यात येणार आहे.
प्रत्येक परीक्षा केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आलेले असून, या प्रक्रियेच्या लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे सीईटी कक्षात देखरेख करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक परीक्षा केंद्रामध्ये पर्यवेक्षण करणार्या पर्यवेक्षकांना बॉडी कॅमेरा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये, याची दक्षता घेण्यात येत असल्याची महिती ‘सीईटी’ सेलने दिली आहे. उमेदवाराची पडताळणी त्यांनी सोबत आणलेल्या मूळ ओळखपत्रावरून आधार कार्ड, पॅन कार्ड, पारपत्र इत्यादी करण्यासाठी गट अ शासकीय अधिकार्यांची केंद्रप्रमुख म्हणून, तर परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विभागीय स्तरावर सहसंचालक, तंत्रशिक्षण यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रांवर काही अडचण आल्यास सीईटी कक्षाशी समन्वय साधून तातडीने दूर करण्याकरिता जिल्हा स्तरावर शासकीय संस्थांच्या प्राचार्यांची जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. सर्व जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रांवर भरारी पथकामार्फतसुद्धा तपासणी केली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर पोलिस सुरक्षा पुरविण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.
यंदा तब्बल दहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. त्या प्रत्येक विद्यार्थ्याची चेहरा पडताळणी होणार आहे. विद्यार्थी केंद्रावर आल्यानंतर या फेशियल रेकग्निशनला सामोरे जावे लागेल. विद्यार्थ्याने अर्ज करताना दिलेला फोटो आणि चेहरा यात 80 टक्के साधर्म्य आढळणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, हा फेशियल रेकग्निशनचा अहवाल जपून ठेवण्यात येणार असून, विद्यार्थी जेव्हा सामायिक प्रवेश प्रक्रियेत प्रवेशासाठी येईल, त्यावेळी त्याने सादर केलेल्या फोटोसह त्याच्या अर्जावरील फोटो आणि परीक्षेदरम्यान चेहरा पडताळणीवेळीचा चेहरा यांचे तपशील जुळवून तपासले जाणार आहेत.
पीसीबी गट (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र)
परीक्षा : 9 ते 17 एप्रिल
(10 आणि 14 एप्रिल वगळून)
पीसीएम गट (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित)
परीक्षा 9 ते 27 एप्रिल
(24 एप्रिल वगळून)