पुढारी ऑनलाईन डेस्क : जाती-धर्माच्या नावावर चाललेला नंगानाच थांबवण्याची आवश्यकता आहे. कोण कोण्या जातीचा हे बघून जर किराणा घेतला जात असेल. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाला महाराजांना बोलावले जात असेल, तर हे पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला अशोभनीय आहे, हा शाप दूर करण्याची आवश्यकता आहे. एका हातात संविधान आणि दुसऱ्या हातात भारताची संस्कृती पुढे घेऊन जाणार आहोत. तोडा फोडा आणि राज्य करा, हे इंग्रजाचे मूल्य आजही काही राजकारणी अंमलात आणत आहेत, असे मत नूतन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज (दि.१३) व्यक्त केले. (Congress State President)
अखेर बुलडाणाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ पक्ष नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एकप्रकारे पुन्हा एकदा पक्षासाठी महत्वाची दोन्ही पदे विदर्भाकडेच राहिली आहेत. अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणू गोपाल यांनी यासंदर्भातील पत्र दिले आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. मात्र, विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाला. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची तयारी दर्शविली. दरम्यान, पटोले यांच्या एककल्ली कारभारामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाल्याच्या तक्रारी देखील काँग्रेस हाय कमांडकडे करण्यात आल्या होत्या. गेले काही दिवस विजय वडेट्टीवार, अॅड. यशोमती ठाकूर, नितीन राऊत, विश्वजीत कदम, अमित देशमुख, सतेज पाटील अशी अनेक बड्या नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र, पक्ष श्रेष्ठींनी अध्यक्षपदी नव्या चेहऱ्याला संधी दिली.