मुंबई : ‘मूडीज’ने अमेरिकेच्या पतमानांकनात घट केल्यानंतर अमेरिकन कर्जरोख्यांची मागणी घटली आहे. त्यातच अमेरिकेवरील कर्जाचा बोजा आणखी वाढणार असल्याचे संकेत मिळाल्याने जागतिक बाजारपेठेत गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आयटी, ऑटो क्षेत्रातील कंपन्यांसह बलाढ्य उद्योग समूहांच्या शेअर भावात घट झाल्याने सेन्सेक्स 644 आणि निफ्टी निर्देशांक 204 अंकांनी घसरला.
मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सेन्सेक्स बुधवारच्या तुलनेत गुरुवारी (दि. 22) 81,323 या नीचांकावर सुरू झाला. त्यानंतर सेन्सेक्स 1.4 टक्क्याने घटून 80,489 अंकांवर आला. गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 1,100 अंकांहून अधिक घट झाली. मात्र, बाजार बंद होताना सेन्सेक्स 0.79 टक्क्याच्या घटीसह 80,951 अंकांवर स्थिरावला. सेन्सेक्सच्या घसरणीमुळे बीएसईतील गुंतवणूकदारांचे दोन लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, नोंदीत कंपन्यांचे भांडवली मूल्य 441 वरून 439 लाख कोटी रुपयांवर घसरले. राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) निफ्टी निर्देशांकही बुधवारच्या तुलनेत गुरुवारी 24,462 अंकांवर घसरला होता.