शेअर बाजार 
मुंबई

शेअर बाजारात मोठी उलथापालथ; सेन्सेक्स 1,420 अंकांनी कोसळला

गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले

पुढारी वृत्तसेवा

मुंबई ः जागतिक पातळीवरील व्यापार युद्धाच्या शक्यतेने गुंतवणूकदारांनी हाय खाल्ली असून, त्याचे जोरदार पडसाद शुक्रवारी शेअर बाजारात उमटले. परिणामी, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,420 अंकांनी कोसळत 73,192 अंकांवर स्थिरावला. त्याबरोबरच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 418 अंकांनी गडगडून 22,126 अंकांवर बंद झाला. निफ्टी सलग पाचव्या महिन्यात घसरणीसह स्थिरावण्याची 1996 नंतरची ही पहिलीच वेळ ठरली. आजच्या सत्रातील घसरण इतकी जलद होती की, त्यात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी स्वाहा झाले.

परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या विक्रीच्या मार्‍याने आजच्या घसरणीला हातभार लावला. बीएसई-30 निर्देशांकातील 27 कंपन्यांचे शेअर एक टक्क्याहून अधिक कोसळले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात दोन टक्क्यांहून अधिक घट झाली. बीएसईवरील 3,248 कंपन्यांच्या शेअरभावात घट झाली असून, 742 कंपन्यांचे शेअरभाव वाढले. यातील 476 कंपन्यांचे भाव गडगडल्याने त्यांना लोअर सर्किट लावावे लागले, तर इंडसइंड बँकेचे शेअर सर्वाधिक 7 टक्क्यांनी कोसळले. टेक महिंद्रा, महिंद्रा अँड महिंद्रा, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, टायटन, इन्फोसिस आणि नेस्लेच्या शेअरभावात 4 ते 6 टक्क्यांनी घट झाली.

गेल्या सप्ताहात सेन्सेक्स 2,113 अंकांनी (2.8 टक्के) कोसळला आहे. तर, गेल्या पाच महिन्यांत सेन्सेक्स उच्चांकी 85,978 अंकांवरून 15 टक्क्यांनी कोसळला आहे. सेन्सेक्समध्ये सप्टेंबर-2024 पासून तब्बल पावणेतेरा हजार अंकांनी घसरण झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात सेन्सेक्स चार हजारांहून अधिक अंकांनी घसरल्याने बीएसईतील गुंतवणूकदारांचे 40 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) निफ्टी निर्देशांक 1.86 टक्क्याने घटून 22,124 अंकांवर आला. निफ्टी निर्देशांक गत महिनाभरात 1,358 अंकांनी खाली आला आहे. तर, सर्वोच्च 26,277 अंकांवर गेल्यानंतर त्यात 16 टक्क्यांची घट झाली आहे.

घसरणीमागील ही तीन कारणे...

  • मेक्सिको आणि कॅनडावरील प्रस्तावित 25 टक्के शुल्कवाढ 4 मार्चपासून अंमलात येण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी केली. चीनला या दिवसापासून 10 टक्के शुल्कवाढीला तोंड द्यावे लागेल.

  • विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा विक्रीचा मारा सुरू असून, 27 फेब्रुवारी रोजी त्यांनी 556.56 कोटी मूल्याच्या समभागांची विक्री केली. चालू वर्षातील एकूण आकडा 1,13,721 कोटी आहे.

  • विक्रीच्या दबावामुळे निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक 2.9 टक्क्यांनी गडगडला. त्याचबरोबर निफ्टी मिडकॅप निर्देशांकात 1.89 टक्क्याची घसरण दिसून आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT