मुंबई : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या नाट्यातून पुढे येत आता अर्जांची छाननी केली जात असून, यात राजकीय पक्ष एकमेकांना धक्के देत आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या युतीचे तब्बल 9 नगरसेवक विजयी झाले आहेत. त्यात भाजपच्या 5 आणि शिंदे सेनेच्या 4 उमेदवारांचा समावेश आहे. राज्यभरात महायुतीचे एकूण 16 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
भाजपने केडीएमसीत 5, धुळे महापालिकेत 2, पनवेल 1 आणि भिवंडी महापालिकेत 1 जागा बिनविरोध करत, राज्यात 9 जागांवर बिनविरोध उमेदवार विजयी केले आहेत. तर, शिवसेना शिंदे गटाने केडीएमसीत 4, जळगावात एक जागा बिनविरोध केल्याने, राज्यात 5 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तसेच, अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे, राज्यात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीच्या एकूण 16 जागा बिनविरोध झाल्या आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीने मतदानापूर्वीच विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे 5 आणि शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे 122 सदस्य संख्या असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेल्या 62 जगांपासून महायुती आता केवळ 53 जागा दूर आहे. त्यामुळे भाजप, शिवसेनेत जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची रणनीती यशस्वी ठरत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता शिंदे गटाचेही 4 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांची खेळी यशस्वी झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजपची विजयी घोडदौड
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मतदान होण्यापूर्वीच भाजपची विजयी घोडदौड सुरू झाली आहे. रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेंकर, मंदा पाटील यांच्यासह आता ज्योती पवन पाटील या 24 ब मधून बिनविरोध निवडून आल्या आहेत. ज्योती पवन पाटील यांच्यामुळे बिनविरोध निवडून येणार्या भाजप उमेदवारांची संख्या आता 5 वर पोहोचली आहे. याचे श्रेय रवींद्र चव्हाण यांच्या रणनीतीला दिले जात आहे.
शिंदे गटाचेही वर्चस्व
कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून पॅनेल क्र. 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली रणजित जोशी तर प्रभाग क्र. 28 अ मधून हर्षल राजेश मोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आमदारे राजेश मोरे यांचे हर्षल मोरे हे चिरंजीव आहेत. येथील सर्व अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर या निवडणुका बिनविरोध झाल्या. तसेच याचे श्रेय खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले जात आहे.
अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
अहिल्यानगर महानगरपालिकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने खाते उघडले असून, पक्षाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग क्र. 8 मधून कुमार वाकळे तर प्रभाग क्र. 14 मधून प्रकाश भागानगरे यांनी विजयाची गुलाल उधळला आहे. अहिल्यानगरच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) विजयाचे खाते अत्यंत नाट्यमयरीत्या उघडले. प्रभाग क्रमांक 8 ड मध्ये कुमार वाकळे यांच्या विरोधात केवळ अपक्ष उमेदवार पोपट कोलते यांचा अर्ज वैध ठरला होता. मात्र, कोलते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने वाकळे यांचा मार्ग मोकळा झाला.
जळगावात आमदारपुत्र बिनविरोध
जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेत राजकीय नाट्य पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक 18 (अ) मध्ये शिवसेना शिंदे गटाकडून रिंगणात असलेले आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ. गौरव सोनवणे यांच्या विरोधातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मयूर सोनवणे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने गौरव सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे.