मुंबई : राज्य पोलीस दलातील चार आयपीएस अधिकार्यांच्या मंगळवारी (दि.२४) गृहविभागाकडून बदल्या करण्यात आल्या. त्यात शशिकांत महावरकर यांची पिंपरी-चिंचवडच्या सहपोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच राज्य पोलीस दलातील काही आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर आणखीन काही बदल्या अपेक्षित होत्या. अखेर मंगळवारी गृहविभागाने चार आयपीएस अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यात महिला आणि बाल अत्याचार प्रतिबंधक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांची महाराष्ट्र राज्य नागरी हक्क संरक्षण विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, नागरी हक्क संरक्षण विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक अश्वती दोरजे यांची महिला आणि बाल अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांची पुण्याच्या पिंपरी-चिंचवडच्या सहपोलीस आयुक्त आणि पुण्याचे पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान विभागाचे पोलीस उपनिरीक्षक एस. जी दिवाण यांची मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत आणखीन काही पोलीस अधिकार्यांच्या बदल्या होणार आहेत.