मुंबई : दादरच्या कोहिनूर हॉलमध्ये झालेल्या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित सहकार कार्यकर्ते व मतदारांना मार्गदर्शन करताना भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर. pudhari photo
मुंबई

State Cooperative Federation election : राज्य सहकारी संघाची निवडणूक सहकाराला नवी दिशा देणारी ठरणार

कार्यकर्ता मेळाव्यात आ. प्रवीण दरेकरांकडून विश्वास व्यक्त

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्य सहकारी संघाची यंदाची निवडणूक राज्याच्या सहकार क्षेत्राला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्‍वास भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांनी येथे कार्यकर्ता व मतदारांच्या मेळाव्यात व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक रविवारी 27 जुलै रोजी होत असून, 21 जागांसाठी होणार्‍या या निवडणुकीत आमदार प्रवीण दरेकर, संजीव कुसाळकर आणि शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलचे 9 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते व मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी कोहिनूर हॉल, दादर येथे आयोजित मेळाव्यात दरेकर बोलत होते.

या मेळाव्याला मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, राज्य संघाचे उमेदवार नंदकुमार काटकर, मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, राज्य कंझ्युमर फेडरेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसले, संचालिका जयश्री पांचाळ, शिल्पा सरपोतदार, मुंबई सह. बोर्डाचे अध्यक्ष अनिल गजरे, म्युनिसिपल को-ऑप बँकेचे सर्वेसर्वा विष्णू घुमरे, आनंदराव गोळे यांसह मोठ्या संख्येने सहकारातील कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते.

महाराष्ट्र सहकारी संघाला 106 वर्षांची परंपरा आहे. या संघाची स्थापना महात्मा गांधींनी केली. वसंतदादा पाटील ते गुलाबराव पाटील यांच्यासारखे अनेक दिग्गज नेते संघाचे अध्यक्ष झार्ले; परंतु संघाची अवस्था अतिशय बिकट असून तोट्यात असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढण्यास सांगितले. परिणामी, महाराष्ट्रातील वातावरण बदलले आणि ही निवडणूक आता केवळ सोपस्कार राहिला आहे. ही निवडणूक राज्य संघ कोण जिंकणार? कोण अध्यक्ष होणार? यापेक्षा राज्यातील सहकाराला नवीन दिशा देणारी ठरणार आहे, असे दरेकर म्हणाले.

मुंबईतून 100 टक्के मतदान कप-बशीला झाले पाहिजे

दरेकर म्हणाले की, ही निवडणूक पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आहे. 1,188 मतदार आहेत. तिथे 100 टक्के मतदान झाले पाहिजे. जेव्हा निकाल लागेल तेव्हा मुंबईतून 100 टक्के मतदान कप-बशीला झालेय हा संदेश राज्यात गेला पाहिजे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर जनतेचा आपल्यावर विश्वास आहे. आपण ताकदीने ही निवडणूक लढवायची आहे. सहकार कार्यकर्त्यांचा असला पाहिजे, तो खासगी होऊ नये यासाठी आपल्याला काळजी घेणे गरजेचे असल्याचेही दरेकर म्हणाले.

राज्य आणि केेंद्र सरकारही सहकाराच्या पाठीशी आहे

राज्याचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सहकारासाठी चांगल्या गोष्टी करून घेऊ. उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे पाठीशी आहेत. केंद्रात कधीच सहकार खाते नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते निर्माण केले व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे त्या खात्याची जबाबदारी सोपवली. देशात सहकाराला ताकद देण्याचे काम होत आहे. केंद्राचे सहकार धोरण तयार होणार आहे. ज्यावेळी आपल्या संस्था भक्कम असतील, तेव्हा सरकारला सांगू खासगी बँकांच्या तोडीस तोड आमच्या सहकार संस्था आहेत. आपले प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी असू द्या. सर्व गोष्टी करून दाखवायची धमक नक्की आहे. येणार्‍या काळात ती दिसून येईल, असा विश्वासही दरेकरांनी उपस्थितांना दिला.

वैभवशाली दिवस आणणार

दरेकर म्हणाले की, राज्य संघाच्या माध्यमातून संघाला दिशा देणार आहोत. शिक्षण-प्रशिक्षण निधी पूर्ववत प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करू. बदल करून खरे प्रशिक्षण द्यायचे आहे. अडचणीतील संघाला पुन्हा वैभवशाली दिवस आणण्याचे आम्ही ठरवले असून ते करून दाखवू. मुंबई बँकेला सतराशे कोटींवरून पंधरा हजार कोटींवर नेले. आमच्यावर टीका झाल्या, पण डगमगलो नाही. कारण मुंबईतील संस्थांचा आमच्यावर विश्वास होता. रायगड बँक अडचणीत होती, तिला बाहेर काढले. बंद पडलेल्या संस्था जगल्या पाहिजेत ही भूमिका घेऊन आम्ही काम करतोय.

सहकार पॅनलचे उमेदवार

इतर संस्था मतदारसंघ

1) नंदकुमार काटकर

2) संजीव कुसाळकर,

3) सुनील पाटील (सांगली),

4) नितीन बनकर

5) रामदास मोरे

6) अर्जुनराव बोरुडे, इतर मागास प्रवर्ग

7) धनंजय शेडगे, कोल्हापूर विभाग

8) वसंत पाटील, लातूर विभाग

9) प्रकाश भिशीकर, नागपूर विभाग

10) अशोक जगताप, विभागीय सहकारी संघ प्रतिनिधी

11) संजय पाटील, नाशिक विभाग

12) विलास महाजन, अमरावती विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT