पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांना दिलासा देणारा मोठा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क (Stamp Duty) माफ करण्यात आले आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश बावनकुळे यांनी दिले आहेत.
जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासह शासकीय कामासाठीच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क आता माफ असेल.
यापुढे एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित (सेल्फ अटेस्टेट) अर्ज लिहून प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळू शकेल. दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी आणि पालकांचा या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी लागणारा एकूण ३ ते ४ हजारांचा खर्च वाचणार आहे.
याआधी मुद्रांक शुल्क १०० रुपयांवरून ५०० रुपयांपर्यंत वाढवण्यात आले होते. याचा फटका विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांना बसला होता. पण हे शुल्क आता माफ करण्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. जेव्हा या परीक्षांचा निकाल लागतो, तेव्हा सर्व विद्यार्थी व पालकांची ही सर्व प्रमाणपत्रे जमा करण्यासाठी झुंबड उडते. आतापर्यंत सर्व प्रमाणपत्रासाठी किमान ३ ते ४ हजारांचा खर्च पालकांना लागायचा. यापुढे कसलेही मुद्रांक शुल्क न भरता केवळ स्वसाक्षांकित अर्ज लिहून तहसील कार्यालयातून प्रमाणपत्र मिळू शकणार आहेत. त्यामुळे दरवेळी पालकांचा होणारा ३ ते ४ हजारांचा खर्च इथून पुढे होणार नाही. केवळ शैक्षणिकच नाही तर इतर अनेक कारणांसाठी प्रतिज्ञापत्र दाखल करताना ही सर्व प्रमाणपत्रे वेळोवेळी लागत असतात. त्यामुळे हा निर्णय राज्यातील कोट्यवधी नागरिकांसाठी लाभदायी असणार आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे निर्देश मी महसूल खात्याच्या वतीने प्रशासनाला दिले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.