मुंबई : दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एस. टी. महामंडळाने 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर अशी 20 दिवसांसाठी ही भाडेवाढ असेल. या भाडेवाढीमुळे दिवाळीत महामंडळाच्या तिजोरीत सुमारे एक हजार कोटींचा महसूल जमा होण्याची शक्यता आहे.
अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील जनतेचे कंबरडे मोडले आहे. दिवाळी कशी साजरी करायची, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असताना एस. टी. महामंडळाने मात्र आपल्या फायद्यासाठी भाडेवाढीचा निर्णय घेऊन ग्रामीण भागातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे. भाडेवाढीमुळे राज्यातील नागरिकांचा एस. टी.चा लांब पल्ल्याचा प्रवास 90 ते 100 रुपयांनी महागणार आहे. गर्दीच्या हंगामात राज्य परिवहन प्राधिकरणाने 30 टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्यास एस. टी. महामंडळाला मान्यता दिली आहे. त्यानुसार गर्दीच्या हंगामात तात्पुरत्या स्वरूपाची भाडेवाढ केली जाते. यंदादेखील 10 टक्के हंगामी भाडेवाढ केली जाणार आहे. साध्या, विठाई, शिवशाही, निमआराम बसकरिता ही भाडेवाढ लागू असणार आहे. मात्र, मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरीकरिता भाडेवाढ लागू असणार नाही.