ST Parcel Service Pudhari
मुंबई

ST Parcel Service: राज्यात एसटीच्या पार्सल सेवेला ब्रेक; दोन महिन्यांनंतरही नवीन ठेकेदार नियुक्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

दोन महिने उलटूनही नियुक्ती रखडली; आर्थिक तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला आणखी नुकसानीचा फटका

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: दोन महिने उलटून गेले तरी नवीन ठेकेदार नियुक्त करण्यास चालढकल केली जात असल्यामुळे एसटीच्या पार्सल सेवेला ब्रेक लागला आहे. नवीन ठेकेदार नियुक्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे आधीच आर्थिक तोट्याचा सामना करत असलेल्या परिवहन महामंडळाला आर्थिक नुकसानीचा फटका बसत आहे.

एसटीने पार्सल वाहतुकीसाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराचा ठेका जुलै २०२६ मध्ये संपुष्टात आला. मात्र, दोन महिने उलटूनही नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आलेली नाही. एसटी महामंडळाला पार्सल सेवेतून वर्षाकाठी सुमारे १७ कोटी रुपयांचे उत्पन्‍न मिळते.

आर्थिक अडचणीत असलेल्या महामंडळासाठी हा महसूल महत्त्वाचा आहे. असे असतानाही पार्सल सेवेसाठी वेळेत नवीन ठेकेदार नियुक्त करण्यात न आल्याने महामंडळाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पार्सल वाहतुकीचा ठेका संपण्यापूर्वीच नवीन ठेकेदार नियुक्त करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र, याबाबत निर्णय न झाल्याने ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत पार्सल सेवेचे कामकाज बंद पडले आहे. सध्या महामंडळाकडून नवीन ठेकेदार नियुक्त करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून त्यासाठी अनेक निविदाही प्राप्त झाल्या आहेत. ही प्रक्रिया आधीच पूर्ण केली असती, तर पार्सल सेवेत खंड पडला नसता.

अन्य खासग सेवांच्या तुलनेत एसटीची पार्सल सेवा स्वस्त असल्याने ग्रामीण भागातील अनेक लहान व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

नियमित ग्राहक खासगी वाहतुकीकडे

पार्सल वाहतुकीसाठी एसटीच्या बसचा वापर करता यावा, यासाठी एका अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, वरिष्ठांकडून पार्सलच्या ने-आण करण्यासाठी पास उपलब्ध करून देण्याबाबत आदेश प्राप्त झाले नाही. त्यामुळे पास देता येत नसल्याची खंत या अधिकाऱ्याने व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT