मुंबई : सेंट जॉर्ज रुग्णालयाचा अतिदक्षता विभाग मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांत 1,276 रुग्णांपैकी तब्बल 520 जणांना आपला जीव गमवावा लागला. म्हणजे दर पाच रुग्णांपैकी दोनांचा मृत्यू होत आहे. त्यातही जवळपास 13 टक्के रुग्णांनी उपचार अर्धवट सोडून पळ काढला आहे.
आयसीयूमध्ये अप्रशिक्षित डॉक्टर
या रुग्णालयात आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक इंटर्नकडून आयसीयू ड्युटी घेतली जात असल्याचे उघड झाले आहे. क्रिटिकल केअरची कुठलीही प्रशिक्षित पात्रता नसताना या इंटर्नकडून जीव-मृत्यूचा खेळ सुरू आहे! आरटीआय कार्यकर्ता ॲड. तुषार भोसले यांनी केलेल्या चौकशीत उघड झाले की, जेजे हॉस्पिटलचे एमडी आणि रेसिडेंट डॉक्टर अतिरिक्त ऑन-कॉल ड्युटी टाळण्यासाठी सेंट जॉर्जची आयसीयू ड्युटी करण्यास नकार देतात. तर सेंट जॉर्जमधील डॉक्टर ड्युटीवर अनुपस्थित असून पगार मात्र घेत आहेत, इतकेच नव्हे तर काहींनी दोन रुग्णालयांत काम करत दोन-दोन वेतन घेण्याचीही कला आत्मसात केली आहे.
आरटीआयमध्ये चुकीचा आकडा देण्यात आला आहे. वार्षिक मृत्यू दर 15 टक्क्यांच्या आसपास आहे.डॉ. विनायक सावर्डेकर, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय