ST ticket price
मुंबई: इंधन दरवाढीमुळे एसटी तिकीट दरात वाढ करण्याचे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्याने लालपरीचा प्रवास महागणार आहे. "एसटी महामंडळाला डिझेलसाठी विशेष सवलत दिली तर वाढ होणार नाही, मात्र विशेष सवलत न मिळाल्यास दरवाढ करावी लागेल," असे मंत्री सरनाईक यांनी आज (दि. १८) स्पष्ट केले.
मंत्री सरनाईक यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, "एसटीला १० लाख ८७ हजार लिटर डिझेल लागतं. हा पुरवठा इंडियन ऑईलकडून होत असतो. मागील आठवड्यात डिझेलच्या दरात ३ रुपये वाढ केली आहे. या दरवाढीमुळे ३३ लाख ७० हजार जास्त मोजावे लागत आहेत. महामंडळाला यामुळे वर्षाला १२४ कोटींचा तोटा होणार आहे. जागतिक पातळीवर युद्धाचा भडका उडाल्यास आणखी परिणाम होईल. त्यामुळे एसटीकरीता विशेष सवलत देण्याचा निर्णय झाल्यास आम्ही दरवाढ करणार नाही, मात्र सवलत नाही मिळाली तर दरवाढ करावी लागेल," असे सरनाईक म्हणाले.
"उद्या कॅबिनेट बैठकीक मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र देणार आहे. मे महिना होईपर्यंत आम्ही थांबणार आहोत. पुढील १० ते १२ दिवस केंद्र आणि राज्यसरकारने योग्य पुर्तता केली आणि ऑईल कंपनीकडून आधीच्या किंमतीत डिझेल मिळालं तर दरवाढ करणार नाही. इंधनवाढ झाली तर आम्हाला दरवाढ करावी लागेल. ज्या घटकांना सवलती दिल्या आहेत त्या मात्र लागू राहतील," असेही सरनाईक यांनी सांगितले.
बाईक टॅक्सीबाबत बोलताना सरनाईक म्हणाले की, बाईक टॅक्सीबाबत सायबर पोलिसांना पत्र देऊन फक्त अनधिकृत बाईक टॅक्सीवर कारवाई करण्यास सांगितले आहे. याआधी काही ठिकाणी महिलांबरोबर गैरप्रकार घडले होते. कंपन्यांकडून अनेक नियम पायदळी तुडवले जात होते, त्यामुळे ही भूमिका घेतली होती. १५ तारखेला गुगलला पत्र दिलं. त्यानंतर त्यांनी ओला उबेरच्या सरसकट गाड्यांवर बंदी घातली. त्यामुळे तो घोळ झाला, फक्त अनधिकृत बाईक टॅक्सीवर कारवाई केली जाईल, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.