मुंबई

ST Bank : एसटी बँकेतील अनियमितता प्रकरणाच्या चौकशीसाठी सात अधिकाऱ्यांची नियुक्ती

बँकेच्या ७३ वर्षांच्या इतिहासातील पहिलीच घटना

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेत झालेल्या लाखो रुपयांच्या अनियमिततेच्या चौकशीसाठी सहकार विभागाने सात अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. एसटी बँकेच्या ७३ वर्षांच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असल्यामुळे बँकेचे संचालक आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

सहकार विभागाच्या मुंबई विशेष लेखापरीक्षक कार्यालयाकडून या कामकाजाच्या वाटपाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या चौकशीत बँकेच्या कामकाजातील दहा महत्त्वाच्या मुद्द्यांची तपासणी करण्यात येणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांना नेमून दिलेल्या मुद्द्यांवर चौकशी करून अभिप्रायासह अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अंतिम अहवाल जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई शहर यांच्या कार्यालयात सादर करण्यात येणार आहे.

अधिकारी व त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी

१) स्मिता सावंत : बँकेतील नोकरभरतीबाबत न्यायालयाच्या आदेशानंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याच्या मुद्द्याची चौकशी.

२) पी. ए. मुंडे : बँकेच्या ठेवी कमी होण्यामागील कारणांची तपासणी. संचालकांनी निर्धारित निकष डावलून खर्च केल्याच्या प्रकरणाची चौकशी.

३) प्रदीप सानप : बँकेच्या ५० शाखांमध्ये फर्निचर नव्याने खरेदी करणे आणि दुरुस्तीच्या कामांवर झालेल्या खर्चाची तपासणी.

४) सुधीर बांबरे : बँकेने नव्याने खरेदी केलेल्या सॉफ्टवेअरच्या व्यवहाराची चौकशी.

५) प्रशांत टकले : सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा नियुक्ती देऊन गैरव्यवहार झाल्याच्या मुद्द्याची तपासणी. न्यायालयीन प्रकरणांमध्ये अवास्तव फी दिल्याच्या प्रकरणांची चौकशी.

६) राहुल भोर : एसी खरेदी व महाव्यवस्थापकपदाचा पदभार यासंदर्भात तक्रारींची चौकशी.

७) रोशन संखे : प्रशासकीय व आर्थिक अनियमितता तपासणी.

सहकार विभाग, पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा यांनी आतापर्यंत केलेल्या पत्रव्यवहाराचे स्वरूप व गैरव्यवहार पाहता बँकेचे दोषी पदाधिकारी, अधिकारी व संचालकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT