मुंबई : एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार्या 8 हजार नवीन बसेससाठी मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी महामंडळात 17 हजार 450 चालक आणि सहायकांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी 2 ऑक्टोबरपासून निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शनिवारी दिली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 300 व्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक आणि सहायक मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने 3 वर्षे कालावधीसाठी घेण्याकरिता ई-निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही ई-निविदा प्रक्रिया सहा प्रादेशिक विभागनिहाय राबविण्यात येईल. प्रक्रिया झाल्यानंतर मनुष्यबळ पुरविणार्या संस्थांकडून परिवहन महामंडळाला मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल.
कंत्राटी पद्धतीने भरती होणार्या चालक आणि सहायक उमेदवारांना एस.टी.कडून प्रशिक्षणदेखील दिले जाणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. या कंत्राटी कर्मचार्यांना मासिक किमान 30 हजार रुपये इतके वेतन मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बसेसची वाढती संख्या आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना सुरक्षित, तसेच दर्जेदार बससेवा पुरविणे शक्य होईल, असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. तसेच, या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या संधीचा पुरेपूर फायदा होतकरू तरुण-तरुणींनी घ्यावा, असे आवाहनही सरनाईक यांनी केले आहे.
30 हजार रुपये वेतन आणि प्रशिक्षण
भरतीत निवड झालेल्या कंत्राटी कर्मचार्यांना मासिक किमान 30 हजार रुपये इतके वेतन देण्यात येणार असून, त्यांना आवश्यक ते प्रशिक्षणही दिले जाईल, असे सरनाईक यांनी सांगितले.