SRPF Constable Death: मुंबईतील मलबार हिल परिसरातील महाराष्ट्र लोकभवनात ड्युटीवर असताना मृत्यू झालेल्या एसआरपीएफ जवान कौस्तुभ सांगळे यांच्या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. प्राथमिक तपासात वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही बाबी समोर आल्या असून, पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नसून, तपास पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कौस्तुभ सांगळे हे एसआरपीएफ गट-16, कोल्हापूर येथे कार्यरत होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची मुंबईतील अतिसुरक्षित महाराष्ट्र लोकभवन येथे नियुक्ती करण्यात आली होती. सोमवारी सायंकाळी ते सुरक्षा ड्युटीवर असताना त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस रायफलचा वापर करून जीवन संपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
घटनास्थळी पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने तपास सुरू केला असून, जवानाकडून मिळालेल्या कथित सुसाईड नोटचीही तपासणी सुरू आहे. या प्रकरणाची नोंद अपघाती मृत्यू (ADR) म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
तपासादरम्यान कौस्तुभ सांगळे यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांचे एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत जवळचे संबंध होते. दोघांमध्ये विवाहाबाबत चर्चा झाली होती, मात्र नंतर हे नाते पुढे गेले नाही. त्यानंतर संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विवाह दुसऱ्या व्यक्तीसोबत ठरल्याचे समोर आले आहे.
तपासाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित महिलेचा विवाह निश्चित झाल्यानंतर कौस्तुभ यांनी तिच्यासोबतचे काही खाजगी फोटो तिच्या होणाऱ्या पतीला पाठवल्याचा आरोप आहे. हे फोटो कोणत्या उद्देशाने पाठवण्यात आले आणि त्यातून कोणता वाद निर्माण झाला का, याची चौकशी पोलीस करत आहेत. या दाव्याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, कौस्तुभ काही काळापासून मानसिक तणावाखाली होते. त्यांनी जीवन संपवण्याचा इशारा दिला होता का, त्याबाबत संबंधित यंत्रणांकडे काही माहिती होती का, तसेच त्यांना समुपदेशन किंवा मानसिक आरोग्याची मदत उपलब्ध करून देण्यात आली होती का, याचाही तपास सुरू आहे.
तपास यंत्रणा त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचाही अभ्यास करत असून, वैयक्तिक परिस्थितीचा त्यांच्या मानसिक स्थितीवर काही परिणाम झाला होता का, याची पडताळणी केली जात आहे.
या घटनेनंतर एसआरपीएफमध्ये कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित प्रक्रिया आणि नियमानुसार होणाऱ्या तपासण्या पार पडल्या होत्या का, याचीही चौकशी केली जात आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रे आणि नोंदी तपासल्या जात असून, सर्व बाबींचा सखोल तपास सुरू आहे. सध्या या प्रकरणाचा तपास मलबार हिल पोलीस करत असून, अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.