मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन होऊन कैक वर्षे लोटली तरी अद्याप मुंबई झोपडपट्टीमुक्त झाली नाही. दरवर्षी नव्याने केली जाणारी अतिक्रमणे यामागे कारणीभूत आहेत. त्यामुळे आता अतिक्रमणांवर लक्ष ठेवण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने नेटवर्क फॉर एन्क्रोचमेंट ट्रॅकिंग ॲण्ड रिपोर्टिंग फॉर मुंबई म्हणजेच नेत्रम हे पोर्टल विकसित केले आहे.
काही दिवसांपूर्वी नेत्रम पोर्टलची चाचणी घेण्यात आली. यानुसार 2011 ते 2025 या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली. मालाडच्या मालवणी भागात हे प्रमाण सर्वाधिक आहे. 15 वर्षांच्या कालावधीत मालवणीतील 6 हेक्टर जागेवर अतिक्रमण करण्यात आले. त्यामुळेच अतिक्रमणांवर लक्ष ठेवणाऱ्या नेत्रम पोर्टलची निर्मिती गुजरातच्या भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ॲप्लिकेशन्स ॲण्ड जिओइन्फर्मेटिक्स या संस्थेच्या मदतीने करण्यात आली.
नेत्रम पोर्टलद्वारे मुंबईच्या विविध भागांतील सॅटेलाइट छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात येतो. यात असे दिसून आले आहे की, मालाड मालवणी, पहाडी गोरेगाव, देवनार, मानखुर्द, कुर्ला, मिठागरांच्या जागा या ठिकाणी सर्वाधिक अतिक्रमण झाले आहे. मालवणीत 6.14 हेक्टर, पहाडी गोरेगावमध्ये 1 हेक्टर, आकुर्ली येथे 5.98 हेक्टर, देवनार येथे 3.1 हेक्टर इतकी जागा अतिक्रमणांनी व्यापली आहे. नव्याने होणाऱ्या अतिक्रमणांवर यापुढे कठोर कारवाई केली जाणार आहे.