मुंबई

‘पुढारी न्यूज’ चॅनलचे उत्स्फूर्त स्वागत

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : तमाम मराठी वाचकांच्या अनेक पिढ्यांशी अखंड 85 वर्षे जिव्हाळ्याचे नाते जपलेल्या पुढारी समूहाचे 'पुढारी न्यूज' टीव्ही चॅनल मंगळवारी, सकाळी 9 वाजून 39 मिनिटांनी लाँच झाले. महाराष्ट्रावर देश-विदेशातील तमाम मराठी प्रेक्षकांनी चॅनलचे स्वागत पेढे वाटून व फटाके वाजवून केले. 'पुढारी न्यूज' टीव्ही चॅनल हे मराठी माध्यम विश्वात आपला वेगळा ठसा उमटवेल, असा ठाम विश्वास 'पुढारी' वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यांनी यावेळी व्यक्त केला. संपूर्ण राज्यातून नव्हे, तर तमाम मराठी प्रेक्षकांकडून 'पुढारी न्यूज' टीव्ही चॅनलवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

साप्ताहिक म्हणून सुरू झालेल्या 'पुढारी'ने 24 आवृत्त्यांच्या माध्यमातून एक कोटींच्या घरातील वाचकांच्या पाठबळावर टोमॅटो एफ.एम. हे रेडिओ चॅनल आणि नव्या पिढीशी जोडल्या गेलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मनंतर आता सॅटेलाईट न्यूज चॅनलच्या रूपाने माध्यम विश्वात भक्कम पाऊल रोवले आहे. यानिमित्ताने 'मीडिया अंडर वन रूफ' ही 'पुढारी' माध्यम समूहाचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची संकल्पना साकारली आहे.

जल्लोषी स्वागत

जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्याचे काम 'पुढारी' नेहमीच करत आला आहे. जनतेशी असलेल्या या बांधिलकीमुळेच निःपक्ष आणि निर्भीड दैनिक म्हणून 'पुढारी'ची ख्याती आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजून 39 मिनिटांनी 'पुढारी'चे प्रक्षेपण झाले आणि राज्यभर या चॅनलच्या स्वागताचा एकच जल्लोष झाला. गेले काही दिवस या चॅनलविषयी उत्सुकता होती. तो क्षण प्रत्यक्ष साकारताना ग्रामपंचायत ते विविध सार्वजनिक संस्थांपर्यंत आणि शासकीय कार्यालयांपासून घराघरांत 'पुढारी न्यूज' या वृत्तवाहिनीचे स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी फटाके वाजवून, पेढे वाटून चॅनलच्या शुभारंभाचा आनंद व्यक्त करण्यात आला.

वचनपूर्तीचे समाधान

दरम्यान, चॅनलचा शुभारंभ करताना 'पुढारी' वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यांनी 'पुढारी'चे तमाम मायबाप वाचक व प्रेक्षकांना 'पुढारी न्यूज' चॅनल कृतज्ञतापूर्वक सादर करत असल्याचे आपल्या भाषणात सांगितले. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पाहिलेले 'पुढारी न्यूज' चॅनलचे स्वप्न प्रत्यक्ष साकारताना आपल्याला वचनपूर्तीचे समाधान मिळाले, ही आपल्यासाठी सर्वात मोठी गोष्ट असल्याचे डॉ. योगेश जाधव म्हणाले. 'पुढारी'चे संस्थापक संपादक डॉ. ग. गो. जाधव आणि विद्यमान मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी 'पुढारी' वृत्तपत्र समूहाचे वटवृक्षात रूपांतर केल्याचे त्यांनी सांगितले. 'पुढारी'च्या सुवर्ण महोत्सवासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी व अमृत महोत्सवासाठी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आवर्जून उपस्थित राहिल्याचेही डॉ. योगेश जाधव यांनी सांगितले. 'आवाज जनतेचा' हे पुढारी चॅनलचे घोषवाक्यच नाही तर चॅनलच्या पत्रकारितेचा आत्मा आहे. सियाचीनमध्ये जवानांसाठी उभारलेले हॉस्पिटल तसेच गुजरातमधील भूकंपग्रस्त भागात उभारलेले हॉस्पिटल, शेतकर्‍यांचे प्रश्न, जनसामान्यांचे प्रश्न असोत की त्यावरील आंदोलन, या प्रत्येक प्रश्नावर 'पुढारी'ने नेतृत्व केले आहे, असे योगेश जाधव म्हणाले.

अत्याधुनिक भव्य स्टुडिओ

आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रिंटिंग टेक्नॉलॉजी 'पुढारी'ने मराठी वृत्तपत्र सृष्टीत पहिल्यांदा आणली. आता 'पुढारी'ने टीव्हीतही 'स्टेट ऑफ दि आर्ट टेक्नॉलॉजी' उभारली आहे. आज मराठीतल्या कोणत्याही टीव्ही चॅनलपेक्षा अत्याधुनिक आणि भव्य असा स्टुडिओ नवी मुंबईत उभारला आहे. 'पुढारी'च्या पत्रकारांची टीम मराठी मीडिया विश्वातील सर्वोत्तम टीम आहे. मराठी टीव्ही मीडियामध्ये क्रांती घडविण्यासाठी 'पुढारी न्यूज' चॅनल अग्रभागी असेल, असे डॉ. योगेश जाधव यावेळी म्हणाले.

SCROLL FOR NEXT