Dengue Prevention pudhari photo
मुंबई

Dengue Prevention : महापालिका रुग्णालयांत सायंकाळीही ‌‘फिव्हर ओपीडी‌’

पावसाळ्यासाठी सज्ज; डेंग्यू-मलेरियावर विशेष लक्ष

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पावसाळ्यातील डेंग्यू, मलेरिया आणि तापाच्या साथीच्या आजारांवर नियंत्रणासाठी महापालिकेने विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत. तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका रुग्णालयांमध्ये विशेष ‌‘फिव्हर ओपीडी‌’ सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

1 जूनपासून सायंकाळी 4 ते 8 या वेळेत अतिरिक्त ओपीडी कार्यरत राहणार असून तापाच्या रुग्णांची तातडीने तपासणी केली जाणार आहे. रुग्णांचे रक्तनमुने तत्काळ घेऊन डेंग्यू आणि मलेरियाच्या चाचण्या करण्यात येणार असून, पॉझिटिव्ह रुग्णांसाठी स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते मोठ्या रुग्णालयांपर्यंत डेंग्यू-मलेरिया तपासणी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली असून गंभीर रुग्णांना द्वितीय व तृतीय स्तरावरील रुग्णालयांत दाखल करण्यासाठी विशेष तयारी ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, डास प्रतिबंध आणि साथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी महापालिकेने विशेष बैठक घेत विविध विभागांना सूचना दिल्या आहेत. पाणी साचणाऱ्या ठिकाणांची स्वच्छता, जंतुनाशक फवारणी आणि जनजागृती मोहिमांवर भर देण्यात येत आहे. रुग्णालय परिसरात सांडपाणी साचू नये यासाठीही विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.

  • नायर रुग्णालयातही 1 जूनपासून सायंकाळी 4 ते 7 या वेळेत विशेष बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार असून, सर्व तपासण्यांचे अहवाल दोन तासांत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. रुग्णालयात 318 वॉर्ड खाटा, 22 अतिदक्षता खाटा, बालरुग्णांसाठी 10 वॉर्ड खाटा व 7 अतिदक्षता खाटा उपलब्ध ठेवल्या आहेत. श्वसनविकार विभागात 21 वॉर्ड खाटा आणि 6 अतिदक्षता खाटा सज्ज ठेवण्यात आल्या असून, हाय डिपेंडन्सी युनिटमध्ये 15 स्टेप-डाउन अतिदक्षता खाटा उपलब्ध आहेत. तसेच 140 व्हेंटिलेटर्सची सुविधा सज्ज ठेवण्यात आली आहे.

पावसाळ्याच्या काळात नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. डेंग्यू, मलेरिया आणि तापाच्या रुग्णांवर तातडीने उपचार मिळावेत यासाठी सर्व महापालिका रुग्णालयांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी पाणी साचू न देणे आणि स्वच्छतेची काळजी घ्यावी.
अश्विनी भिडे, आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT