मुंबई : राजेश सावंत
गणेशोत्सवातील देखाव्यासाठी अनेक मंडळे कला दिग्दर्शकाची नियुक्ती करून लाखोंचा खर्च करतात. मात्र, मुंबईतील पर्यावरणपूरक गणेशोत्सव मंडळ म्हणून ओळख असलेल्या अंधेरीतील स्वप्नाक्षय गणेशोत्सव मंडळाने यंदा डेकोरेशनची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेच्या परळ येथील पोयबावडी स्पेशल चिल्ड्रन स्कूलच्या विशेष विद्यार्थ्यांकडे सोपवली आहे.
हे मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करीत आहे. मूर्तीपासून सजावट पर्यावरणपूरक असते. यावर्षी मंडळाने विशेष मुलांकडून देखावा करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे कामही परळ, कामगार मैदान समोरील पालिकेच्या स्पेशल चिल्ड्रन स्कूलमध्ये सुरूही झाले आहे. या शाळेतील शिक्षक आर्ट डायरेक्टर सुमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे डेकोरेशन साकारले जात आहे.
विशेष मुलांबाबत समाजामध्ये मोठे गैरसमज आहे. अशा मुलांना अन्य मुलांसोबत पाठवले जात नाही. पण अशी विशेष मुलेही खूप काही करू शकतात. स्वप्नाक्षय गणेशोत्सव मंडळाचा देखावा आम्ही बनवत असून विविध प्रकारची चित्र या मुलांकडून काढून घेण्यात येत आहेति. याच चित्रांचे देखावा उभारण्यात येणार असल्याचे या शाळेचे शिक्षक आर्ट डायरेक्टर डॉ. सुमित पाटील यांनी सांगितले.
विशेष मुलांमध्ये दिव्यांग, अतिचंचलता, डाऊन सिंड्रोम, स्वमग्नता, मेंदूचा पक्षाघात असे प्रकार असतात. यात शारीरिक विकास उशिरा होणे, भाषा, सामाजिक विकास उशिरा होणे. वर्तन समस्या असणे, कमी उंची, मंगोलियन वंशासारखी चेहरेपट्टी, हातापायाची बोटे जाड आणि एक सारखी, रोग प्रतिकारकशक्ती कमी, आक्रमकता, उत्तेजितता, अस्वस्थता, अतिसंवेदनशीलता, चिडचिडपणा, अतिचंचलता. सामाजिक आणि एकमेकांमध्ये कमी संवाद, काही मुलांमध्ये हानिकारक वर्तन करण्याची वृत्ती आदी लक्षणे असतात.
परळ येथील विशेष मुलांची व त्यांच्या शिक्षकांशी भेट घेऊन ही मुले आपले आयुष्य कसे जगतात, त्यांची जीवनशैली कशी याची माहिती घेतली. या मुलांना आपल्या समाजाशी व आपल्याशी समरूप करून घेतले पाहिजे हा संदेश देण्यासाठी यंदा विशेष मुलांकडून देखावा साकारण्यात येत आहे.देवेंद्र आंबेरकर, प्रमुख मार्गदर्शक, स्वप्नाक्षय गणेशोत्सव मंडळ