पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील अडीच वर्षे तुम्ही अध्यक्ष म्हणून अतिशय उत्तम काम केले. आपल्या अडीच वर्षांच्या काळात तुम्ही दोन्ही बाजूला न्याय दिला. संख्याबळावर लक्ष न देता न्याय केला. तो पुढेही कराल ही अपेक्षा व्यक्त करून दुसऱ्यांदा निवडून आलात त्याबाबत तुमचे अभिनंदन करतो, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंतराव पाटील यांनी अध्यक्ष निवडीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची आज सोमवारी विधानसभेत एकमताने निवडीची घोषणा करण्यात आली. यानंतर अभिनंदनपर भाषणात पाटील बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मी त्यांना नेहमी सल्ला दिला की, पुन्हा सरकार आले, तर मंत्री व्हा. आपली इच्छा नाही, पण पक्षाचा निर्णय आहे. कोर्ट म्हणून जास्त काळ राहावे लागले, न्यायदान देताना संयमी काम केले. निकाल असा दिला की अजून सुप्रीम कोर्टाला निर्णय देता आला नाही. तुम्ही कुणालाच डिसक्वॉलिफाय केले नाही, त्याबद्दल आभार. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पक्षफुटीच्या प्रकरणावर पाटील म्हणाले की, एक न्यायमूर्ती घरी गेले. पण निर्णय करता आला नाही. तुम्ही निकाल दिला आता तोच निकाल मान्य करावे लागेल आणि नव्याने सुरुवात करावी लागेल, असे पाटील म्हणाले.
आताच्या सरकारकडे प्रचंड बहुमत आहे. त्यामुळे सर्वांना एकत्र घेऊन हे सरकार चालेल ही अपेक्षा व्यक्त करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा येईल म्हणाले होते. २०१९ ते आले नाही, पण आता ते पुन्हा आले आहेत. त्यांनी स्वतःमध्ये काही बदल केले आहेत, ते आज जाणवले. विरोधी पक्षाबरोबर त्यांनी संवाद साधण्याची तयारी दाखवली. पुढील पाच वर्षे आपण शिस्तबद्ध पद्धतीने कामकाज चालवाल या शुभेच्छा.