मुंबई: डॉ. ई. मोझेस मार्गावरील फेमस स्टुडिओसमोर असलेल्या 1,650 मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम लांबल्यामुळे शुक्रवारी सकाळीही पाणीपुरवठा झाला नाही. सलग दोन दिवस पाणी न आल्यामुळे दक्षिण मुंबईत राहणाऱ्या हजारो कुटुंबीयांचे अक्षरशः हाल झाले.
दरम्यानण जलवाहिनीचे काम शुक्रवारी पूर्ण झाल्याने सायंकाळचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. तसेच, शनिवारपासून न ‘डी’, ‘ई’ आणि ‘जी दक्षिण’ विभागांतील बाधित भागांचा पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने बुधवारी मध्यरात्रीपासून जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र 24 तास उलटूनही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे महापालिकेने शुक्रवारीही ग्रँटरोड डी विभागासह वरळी जी दक्षिण व भायखळा ई विभागामध्ये पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही.
अखेर मुंबई महानगरपालिकेने टँकरने पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले. 50 पेक्षा जास्त टँकरने पाणीपुरवठा केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र टँकरही न आल्याची या भागातील नागिरांची तक्रार आहे. त्यामुळे काहींनी खासगी टँकर मागून आपली तहान भागवली.
या भागाला फटका डी विभाग (ग्रँट रोड)
लॅमिंग्टन रोड, एम. एस. अली रोड, जे. बोमन बेहराम मार्ग, आर. एस. निमकर मार्ग, शुक्लाजी स्ट्रीट, ग्रँट रोड (पूर्व), बलराम स्ट्रीट, संपूर्ण मुंबई सेंट्रल परिसर, ठाकूरद्वार, एम. के. रोड, आर. आर. रोड, जे. एस. एस. रोड, खाडिलकर रोड, गिरगाव रोड, केशवराव खाड्ये रोड
ई विभाग (भायखळा)
के. के. मार्ग, बी. जे. मार्ग, साने गुरुजी मार्ग, कस्तुरबा रुग्णालय, मौलाना आझाद रोड, डेल स्ट्रीट, डॉ. आनंदराव नायर रोड, कामाठीपुरा 1 ते 14 वी गल्ली, चंद्रमणी बुद्ध विहार रोड, आग्रीपाडा परिसर, डॉ. आनंदराव नायर हॉस्पिटल
वरळी जी दक्षिण
साने गुरुजी मार्ग, धोबीघाट.
44 तासांनंतर दुरुस्ती पूर्ण
बुधवारी रात्री 10 वाजता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत अभियंते व कामगार - कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत अवघ्या 44 तासांत हे महत्त्वपूर्ण दुरुस्तीकार्य यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. या कामासाठी उप जल अभियंता (परिरक्षण), कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, दुय्यम अभियंता यांच्यासह 40 कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.