सूर्यप्रकाशाची ऊर्जा आता साठवता येणार 
मुंबई

Solar Energy : सूर्यप्रकाशाची ऊर्जा आता साठवता येणार

आयआयटी मुंबईच्या संशोधकांचा शाश्वत ऊर्जेचा महत्त्वाचा शोध

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : हिमालयातील थंडीचा मुकाबला करण्यासाठी ऊर्जेचा शाश्वत पर्याय देणार्‍या एका क्रांतिकारी प्रयोगात आयआयटी मुंबईच्या संशोधकांना यश आले आहे.‘स्ट्रॉन्शियम ब्रोमाईड’ या संयुगाच्या सहाय्याने सूर्यप्रकाशाची उष्णता साठवून ठेवण्याची थर्मो केमिकल प्रणाली त्यांनी विकसित केली आहे. ही प्रणाली उन्हाळ्यात उष्णता साठवते आणि हिवाळ्यात गरजेनुसार ती वापरता येणार आहे.

लेहसारख्या हिमाच्छादित भागात डिझेल शेगडीवर ऊब मिळवली जाते. मात्र यामुळे कर्ब उत्सर्जन, इंधन वाहतूक खर्च आणि पर्यावरणीय धोके निर्माण होतात. आयआयटीच्या संशोधनामुळे ही गरज भागवण्यासाठी आता रासायनिक ऊर्जेचा साठा वापरता येणार आहे. या प्रणालीत गरम हवेने स्ट्रॉन्शियम ब्रोमाईड स्फटिक निर्जलीत केले जातात. हिवाळ्यात पुन्हा आर्द्र हवा सोडल्यावर ही प्रक्रिया उलटी घडते आणि उष्णता निर्माण होते.

हा प्रकल्प डॉ. रुद्रदीप मजुमदार आणि डॉ. संदीप कुमार साहा यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आला आहे. एका लहान घरासाठी चार महिने पुरेल इतकी सुमारे 500 किलोवॅट ऊर्जा साठवणारी प्रणाली त्यांनी तयार केली असून प्रत्येक युनिट दोन एलपीजी सिलिंडर एवढ्या आकाराचे आहे. रिचार्ज करून ट्रकमधून ही यंत्रणा हिमालयात पोहोचवणे शक्य असल्याचे म्हटले आहे. या प्रणालीच्या सहा प्रयोगशाळा चाचणीत कोणतीही कार्यक्षमतेची घट झाली नाही. अंदाजे 500-600 वेळा ही रासायनिक प्रक्रिया कार्यान्वित होऊ शकते. दीर्घकाळासाठी ती डिझेलपेक्षा स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्याय ठरते. लेहमधील प्रयोगात प्रति किलोवॅट तास खर्च फक्त 31 इतका आल्याने फार खर्चिकही नसल्याचेही म्हटले आहे. संशोधकांच्या मते, ही प्रणाली लष्कराच्या छावण्यांसाठीसुद्धा उपयुक्त ठरू शकते. मात्र, प्रत्यक्ष वापराआधी स्थानिक हवामानाच्या आधारे चाचण्या, धोरणात्मक पाठबळ आणि सामाजिक सहभाग आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.

आयआयटी मुंबईचे डॉ. चंद्रमौळी सुब्रमण्यम म्हणाले की, सौर औष्णिक ऊर्जा प्राणलींची भारतीय सैन्यासाठी देखील उपयुक्तता तपासण्यात आली आहे. त्यासाठी शून्यपेक्षा कमी तापमानात व कठोर हवामानात एखाद्या जागेतील हवा उबदार करण्यासाठी प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. उंचीवर तैनात असलेल्या आपल्या भारतीय सैन्याच्या छावण्यांना वर्षभर, धूरमुक्त उष्मन प्रणाली उपलब्ध करून देऊ शकतील असे उष्मासाठा उपाय आम्ही विकसित करता येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर उष्मा-रासायनिक ऊर्जा साठा वापराचे प्रयोग केवळ जर्मनीसारख्या ठिकाणी व तेही मर्यादित विस्तारासह झालेले आहेत. भारतात या प्रणालीच्या प्रत्यक्ष वापराची चाचणी अद्याप झालेली नसून त्याचा सुरुवातीचा खर्च डिझेल शेगडीच्या तुलनेत जास्त आहे. उष्मा रासायनिक क्षार प्रभारित होण्यासाठी उन्हाळ्यात सूर्याची उष्णता पुरेशी असणे आणि साठवलेली उष्णता बाहेर सोडण्यासाठी हिवाळ्यात पुरेशी आर्द्रता असणे या दोन आवश्यक घटकांवर या प्रणालीची कार्यक्षमता अवलंबून आहे. हे घटक हिमालयातील विविध प्रदेशानुसार बदलतात. तरीही, संशोधकांना विश्वास आहे की क्षेत्रीय चाचण्या, सहायक धोरणे आणि स्थानिक सहभागातून हे तंत्रज्ञान भविष्यात अधिक शाश्वत आणि समावेशक ऊर्जा वापराकडे नेऊ शकणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT