गैरव्यवहार प्रकरण Pudhari News Network
मुंबई

Solapur News : तत्कालीन ग्रामसेवकासह सरपंच, उपसरपंचाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

फताटेवाडी ग्रामपंचायत साडेचार कोटी निधी अपहार प्रकरण

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी ग्रामपंचायतीत ४ कोटी ४२ लाख ९१ हजार ९९३ रुपयांच्या निधी अपहार प्रकरणी वादाच्या भौऱ्यात अडकलेल्या तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच आणि उपसरपंच यांना उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला. न्यायमूर्ती शैलेश ब्राह्मे यांच्या एकलपीठाने तत्कालीन ग्रामसेवक बालाजी दिनकर पाटील, तत्कालीन सरपंच हरिश्चंद्र राठोड आणि उपसरपंच आर. व्ही. जाधव या तिघांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले.

सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये कोट्यावधी रुपयाचा घोटाळा झाल्याची तक्रार विनोद रमेश चव्हाण यांनी केली होती. याची दखल घेत सोलापूर जिल्हा परिषदेच्या तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष तथा कार्यकारी अभियंता यांनी चौकशी करून १ एप्रिल २०२३ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधी फताटेवाडी ग्रामपंचायतीस प्राप्त झालेल्या निधीमध्ये कोटी ४२ लाख ९१ हजार ९९३ रुपयांचा निधी अपहार झाल्याच्या ठपका ठेवण्यात आला.

या प्रकरणी अटकेची शक्यता निर्माण झाल्याने या तिघांनी सोलापूर सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.तो अर्ज फेटाळल्या नंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या अर्जावर न्यायमूर्ती शैलेश ब्राह्मे यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. तक्रारदार चव्हाण यांच्या वतीने ॲड. शशांक सुधीर पटारे यांनी अटकपूर्व जामीन्याला जोरदार आक्षेप घेतला.

तक्रार निवारण समितीच्या अहवालानुसार, तिघा जणांनी संगनमत करून मोजमाप पुस्तिकेत नोंद न करता निधीचा गैरवापर केला आहे, एकाच कामावर दुबार खर्च दाखवला आहे तसेच मूल्यमापन करण्यापूर्वीच रक्कम खर्ची केली आहे. ई-निविदा व खरेदी प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करून याप्रकरणी सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळावा अशी विनंती केली. ही विनंती मान्य करत न्यायालयाने आरोपींचे अटकपूर्व जामीत अर्ज फेटाळून लावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT