पुढारी ऑनलाईन : पालिकांच्या निवडणुकांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येतच राहणार. मुंबई महापालिका मोदींना मिळवायची आहे म्हणूनच ते मुंबईला येत आहेत. शिंदे गट आणि भाजप मुंबई महापालिकेसाठी असमर्थ असल्यानेच पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज ( दि. १० ) केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि. १०) मुंबई दौऱ्यावर येत आहेत. याबाबत माध्यमांशी बोलताना खासदार राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, मात्र त्यांचे लक्ष हे मुंबई महापालिकेवर आहे. इथून पुढेही ते मुंबईत येतच राहणार, तरीही मुंबई पालिका आम्हीच जिंकणार, असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नरेंद्र मोदी यांनी का दिली नाहीत? अदानींच्या पाठीमागे नेमकी अशी कोणती शक्ती आहे की, ते 609 व्या स्थानावरून थेट दुसऱ्या स्थानावर कसे आलेत? असे सवालही राऊत यांनी केले.