सर्पमित्रांना ओळखपत्रासह 10 लाखांचा अपघात विमा  pudhari photo
मुंबई

Snake friend ID card and insurance : सर्पमित्रांना ओळखपत्रासह 10 लाखांचा अपघात विमा

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : ग्रामीण भागात वन्यजीव आणि मानवी संघर्ष कमी करण्यासाठी, विशेषतः सर्पांपासून होणारे धोके टाळण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणार्‍या सर्पमित्रांना आता लवकरच अधिकृत ओळखपत्र आणि 10 लाख रुपयांचा अपघात विमा मिळणार आहे.

या सर्पमित्रांना ‘अत्यावश्यक सेवा’ आणि ‘फ्रंटलाइन वर्कर’ म्हणून दर्जा देण्याबाबतही सकारात्मक विचार सुरू असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालय दालनातील बैठकीनंतर दिली.

या बैठकीला वनविभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, राज्य वन्यजीव संरक्षक एम. श्रीनिवास राव, अखिल भारतीय सर्पमित्र व प्राणिमित्र संघटनेचे अध्यक्ष प्रा. संभाजीराव पाटील आदी उपस्थित होते.

वन्य प्राण्यांकडून होणार्‍या त्रासातून ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी सर्पमित्र नेहमीच धावून येतात. अनेकदा जीव धोक्यात घालून ते सर्पांना पकडून सुरक्षित स्थळी सोडून देतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत, त्यांना अपघात विमा मिळावा अशी बर्‍याच काळापासून मागणी होती. सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्र देण्याबरोबरच, त्यांना 10 लाख रुपयांचा अपघात विमा देण्यासाठी सविस्तर कार्यपद्धती तयार केली जाईल. या निर्णयामुळे सर्पमित्रांच्या कार्याला अधिकृत मान्यता मिळेल, असे महसूल मंत्री म्हणाले.

वनविभागाच्या वेबसाईटवर सर्पमित्रांची माहिती

सर्व सर्पमित्रांची अधिकृत माहिती उपलब्ध होण्यासाठी एक विशेष पोर्टल तयार करण्यात येणार आहे. ही सर्व माहिती वनविभागाच्या पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामुळे गरजूंना तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधणे सोपे होईल आणि त्यांच्या कामात अधिक पारदर्शकता येईल. या निर्णयामुळे सर्पमित्रांच्या कार्याला प्रोत्साहन मिळेल आणि वन्यजीव संरक्षणात त्यांचा सहभाग अधिक वाढेल, अशी अपेक्षा अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT