मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुंबई कार्यालयाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत येणार्या 22 सेवा शासनाच्या आपले सरकार’ या पोर्टलवर ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या सर्व सेवांचा आता नागरिकांना लाभ घेता येणार आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या ऑनलाइन सेवेमुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाशी संबंधित नागरिकांच्या समस्या व प्रश्नांचे निराकरण अधिक वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सेवांमध्ये ना हरकत प्रमाणपत्रे व इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या व प्रमाणपत्रांच्या प्रमाणित प्रती उपलब्ध करुन देण्याचा समावेश आहे. या ऑनलाइन सुविधेमुळे प्रशासकीय कामे अधिक सुलभ आणि प्रभावी होण्यास मदत होणार आहे.
विनियम क्रमांक 33(10) आणि 33(11) अंतर्गत प्राप्त प्रस्तावांच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या परिशिष्ट सहाच्या प्रमाणित प्रती, परिशिष्ट दोनची अर्जदाराची प्रमाणित प्रत, झोपडीधारकांचे ओळखपत्र सर्वेक्षण 2000ची गणना पावती, झोपडीधारकांच्या बँक खात्यावर भाडे प्रदान तपशीलाच्या प्रती इत्यादी सेवा ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत.